कऱ्हाड : तासवडे (ता. कऱ्हाड) येथील औद्योगिक वसाहतीमधील ‘मिआॅसिस केमिकल’ नावाच्या कंपनीत सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागल्यानंतर रसायनाचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगार जागीच ठार झाले, तर कंपनी मालकाच्या पत्नी व वडिलांसह पाचजण जखमी झाले. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना पुढील उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे. विश्वजित बबन कुंभार (वय २६, रा. तळबीड, ता. कऱ्हाड), अजित देसाई (२५, रा. सैदापूर, ता. कऱ्हाड) अशी ठार झालेल्या कामगारांची नावे आहेत. प्रभाकर शंकर कुंभार (५९), गीतांजली किशोर कुंभार (२३, दोघेही रा. पाटण), अनिल शांताराम कणसे (वय २५, रा. सैदापूर), अश्विनी नीलेश सूर्यवंशी (२५, रा. भोळेवाडी, ता. कऱ्हाड), शाईशा अण्णासाहेब निकम (२८, रा. इंदोली, ता. कऱ्हाड) हे पाचजण या दुर्घटनेत जखमी झाले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पाटणमधील किशोर प्रभाकर कुंभार यांची तासवडेच्या औद्योगिक वसाहतीत ‘मिआॅसिस केमिकल’ नावाची कंपनी आहे. काही महिन्यांपूर्वीच कुंभार यांनी ही कंपनी स्थापन केली असून औषध कंपन्यांना आवश्यक असणाऱ्या ‘फोर ब्रम्हो ब्रेन्झील फिनॉल’ या कच्च्या मालाचे या कंपनीतून उत्पादन केले जाणार होते. सध्या कंपनीत मालाचे संशोधन आणि परीक्षणाचे काम सुरू होते. त्यासाठी कंपनी मालक किशोर कुंभार यांच्यासह त्यांचे वडील प्रभाकर, पत्नी गीतांजली व सुमारे आठ कामगार दररोज कंपनीत काम करीत होते. आज (रविवार) सायंकाळी कंपनीत काम सुरू असताना तळमजल्यावर अचानक शॉर्टसर्किट होऊन वायरिंगने पेट घेतला. त्यामुळे ठिणग्या उडाल्या. आग लागल्याचे निदर्शनास येताच काही कामगार आग विझविण्यासाठी धावले. मात्र, नजीकच ठेवलेल्या मिथेनॉलच्या कॅनवर ठिणग्या पडल्याने मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, कंपनीच्या दुमजली इमारतीच्या सर्व काचा फुटून इतरत्र विखुरल्या. तसेच आग विझविण्यासाठी धावलेले दोन कामगार जागीच ठार झाले, तर प्रभाकर कुंभार, अनिल कणसे हे गंभीररीत्या भाजले. स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली. त्यामुळे सर्वत्र धूर पसरला. या धुरातच कंपनीतील (इतर कामगार अडकले. त्यावेळी धुरामध्ये श्वास कोंडून गीतांजली कुंभार, अश्विनी सूर्यवंशी व शाईशा निकम या तिघी गुदमरल्या. घटना निदर्शनास येताच परिसरातील इतर कंपन्यांमधील कामगारांसह ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी जखमींना कंपनीतून बाहेर काढले. उपचारासाठी त्यांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक पथक त्वरित त्या ठिकाणी पोहोचले. पथकाच्या प्रयत्नानंतर काही वेळातच आग आटोक्यात आली. उपचारार्थ कऱ्हाडच्या कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्रभाकर कुंभार, अनिल कणसे या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारार्थ त्यांना सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. अश्विनी सूर्यवंशी, गीतांजली कुंभार व शाईशा निकम या तिघींवर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपअधीक्षक मितेश घट्टे, तहसीलदार सुधाकर भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)४स्फोटाची भीषणता एवढी होती की, दोन्ही कामगारांचे मृतदेह छिनविच्छिन्न झाले होते. ४शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. मात्र, मृतदेह ओळखणेही कठीण होते. हातातील कडे व पॅन्टवरून मृतदेहांची ओळख पटविण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. कऱ्हाड उपजिल्हा रूग्णालयासमोर जमाव४स्फोटात ठार झालेल्या विश्वजित कुंभार व अजित देसाई या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सायंकाळी कऱ्हाडच्या उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी रूग्णालयासमोर सुमारे पाचशेजणांचा जमाव जमला. ४अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रूग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
रसायनाच्या स्फोटात दोन ठार
By admin | Updated: January 19, 2015 00:30 IST