उंब्रज : पाल (ता. कऱ्हाड) येथील खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा दरवर्षी लाखो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत पार पडतो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली. परिणामी, गर्दी झाली नाही. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला; पण याचा फटका येथील अर्थकारणाला बसला. यात्रा कालावधीत होणारी कोट्यवधींची आर्थिक उलाढाल ठप्प झाली.
यात्रा दरवर्षी सर्वत्र मोठ्या उल्हासात साजऱ्या होतात. या पाठीमागे भाविकांची श्रद्धा असते. या श्रद्धेने ते मोठ्या उत्साहात यात्रेत सामील होतात. ज्या ठिकाणी गर्दी होते, मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात, त्या ठिकाणी गर्दीच्या सर्व प्रकारच्या गरजा, सेवा पुरवणारे व्यवसाय आपोआप थाटले जातात. त्यामध्ये लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. यात्रा ही त्या परिसरातील अर्थकारणाचे मोठे निमित्त असते.
पाल यात्रेचा विचार केला तर यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्रप्रदेश या राज्यांतून लाखो भाविक येतात. या भाविकांच्या प्रवासाचा खर्चच कोट्यवधी रुपयांचा होतो. यामध्ये एस.टी. महामंडळाच्या गाडीने प्रवास करणाऱ्या भाविकांच्या तिकिटातून दरवर्षी महामंडळ लाखो रुपये आर्थिक फायद्यात असते. याचबरोबर या भाविकांच्या जेवणखाण्यावरही लाखो रुपयांची उलाढाल होत असते. फक्त पाल नव्हे तर महामार्गापासून पालपर्यंत येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील हॉटेल, ढाबे या कालावधीत तुडुंब असतात. हे चित्र यंदा दिसले नाही.
पालमधील वाळवंटात खाद्यपदार्थांसह विविध प्रकारची शेकडो दुकाने थाटली जातात. त्यामध्ये टुरिंग टॉकीज, तमाशाचे फडही लागतात. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एका दुकानाची आर्थिक उलाढाल लाखाहून अधिक रुपयांची होत असते; तर करमणुकीचे थिएटर कायम हाऊसफुल्ल दिसून येत असल्यामुळे तेथील उलाढालही लाखोंच्या घरात जाते. या यात्रेचे विशेष म्हणजे मिरवणुकीवर पिवळा भंडारा व खोबऱ्याचे तुकडे यांची मोठ्या प्रमाणात उधळण होते. शेकडो पोती भंडारा व खोबरे यांची येथे विक्री होते. हे विक्री करणारे लोक स्थानिक व परिसरातील असतात. त्यांनाही या व्यवसायातून आर्थिक फायदा होत असतो. अशा पद्धतीने किरकोळ व्यवसायातून स्थानिक व परिसरातील व्यावसायिक यांची या यात्रेच्या निमित्ताने आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र, यंदा एक रुपयाचीही उलाढाल येथे झाली नाही.
- चौकट
ग्रामपंचायतीलाही करही नाही !
या शेकडो व्यावसायिकांकडून ग्रामपंचायत प्रशासन कर गोळा करते. त्यातून ग्रामपंचायतीचाही मोठा आर्थिक फायदा होत असतो. असे अर्थचक्र या यात्रेच्या निमित्ताने या परिसरात मोठ्या प्रमाणात फिरत असते. यावर्षी ते पूर्णपणे थांबले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने दक्षता म्हणून यात्रेला बंदी घातली, ती योग्य होतीच; पण कोरोनाने या परिसरात यात्रेनिमित्त होणारी कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल थांबवली, हे मात्र नक्की.