मल्हारपेठ, ता. पाटण येथे शासन आदेशानुसार सुरु होत असलेल्या मल्हारपेठ पोलीस स्टेशनचा प्रारंभ गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील, मल्हारपेठचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, उपनिरीक्षक अजित पाटील, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, जिल्हा परिषद सदस्य सुग्रा खोंदु आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून तालुक्यात कुठेही मोठा प्रसंग घडलेला नाही. कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस हा जनतेचा मित्र असला पाहिजे. गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी दिवंगत आर. आर. पाटील यांनी निर्णय घेऊन तंटामुक्त समित्या स्थापन केल्या. त्यामुळे पोलिसांचा ताण कमी झाला आहे. मी गृहराज्यमंत्रिपदाचा परभार स्वीकारल्यानंतर पोलिसाच्या निवासाचा प्रश्न मिटवण्यासाठी ७५० कोटींची तरतूद केली आहे. तर नव्याने काही पोलीस स्टेशनच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यापैकी मल्हारपेठ पोलीस स्टेशनचा प्रश्न मार्गी लावला आहे. लवकरच नवीन इमारतीत सर्व कामे सुरु होतील.
फोटो : ०९केआरडी०१
कॅप्शन : मल्हारपेठ, ता. पाटण येथे पोलीस स्टेशनच्या प्रारंभप्रसंगी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे भाषण झाले.