लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्ह्यासह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे एसटीची सेवा सुरू झाली असली तरी अद्याप रातराणीच्या फेऱ्या ठप्प आहेत. त्यामुळे आगामी काही दिवस तरी सातारकरांनी रात्रीचा प्रवास करणे टाळणेच योग्य ठरणार आहे.
कोरोनाचा शिरकाव सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्चमध्ये झाला. त्यानंतर संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आणले होते. सुमारे सहा ते सात महिने एसटीच्या फेऱ्या बंद होत्या. दरम्यानच्या काळात कोरोना नियंत्रणात आला. दसरा दिवाळीनंतर एसटी पूर्ववत सुरू झाली. लांब पल्ल्याच्या गाड्या धावत असल्याने रात्रंदिवस चोवीस तास प्रवासी वाहतूक सुरू होती. मात्र जिल्ह्यात पुन्हा एप्रिलमध्ये पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. यामुळे पुन्हा सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या एसटीच्या फेऱ्यांचा ब्रेक लागला. दोन ते तीन महिने गाड्या गुन्हा बंद होत्या.
दरम्यान, दुसरी लाटही ओसरू लागल्यानंतर एसटी सुरू झाली. मात्र अद्यापही हवे त्या प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याने एसटीच्या रातराणी गाड्या बंद आहेत. सातारा आगारातून शेवटची गाडी साडेपाच वाजता निघते. त्यानंतर गाडीच नाही. दरम्यान, बाहेरील विभागातून कलेढोण-मुंबई ही गाडी रात्री नऊच्या सुमारास येते. कोल्हापूर, सांगली विभागातून एखाद-दुसरी गाडी येते. पण त्याचेही वेळापत्रक निश्चित नसल्याने रात्री बसस्थानकात शुकशुकाट जाणवत असतो.
चौकट..
पुणे, मुंबईलाही दुपारपर्यंत प्रवासी
सातारा विभागातून स्वारगेट, मुंबई, बोरवली या मार्गांवर बऱ्यापैकी प्रवासी वाहतूक सुरू असते. सातारा-स्वारगेट विनाथांबासाठी दररोज ५८ फेऱ्या धावतात. त्यापैकी तीस फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मात्र अजूनही दुपारच्या गाड्यांना प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे त्या रद्द करण्याची वेळ सातारा आगारातील व्यवस्थापनावर येत आहे.
चौकट २
खूपच गरज असेल तर महामार्गावर...
साताऱ्यातील खासगी प्रवासी गाड्या जिल्हा क्रीडा संकुल परिसरात उभारत असायच्या. मात्र तेथे जम्बो कोरोना सेंटर सुरू झाल्यानंतर तिथून थांबा हलविण्यात आला. तेव्हापासून एसटी स्टँडच्या पाठीमागे रस्त्यावर उभे राहतात. मात्र त्यांनाही प्रवासी मिळत नसल्याने तेथे रात्रीच्या वेळी शुकशुकाट जाणवत असतो. रात्रीचा प्रवास करणे खूपच अत्यावश्यक असल्यास काही सातारकर पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जाऊन इतर जिल्ह्यातून येणाऱ्या खासगी प्रवासी वाहनांचा वापर करत असतात.
कोट
सातारा विभागातून सध्या २२५ गाड्या दररोज धावत असतात. यामध्ये गाड्यांच्या फेऱ्याही वाढविल्या जात आहेत. मात्र दुपारनंतर प्रवासी मिळत नसल्याची शोकांतिका आहे. तरीही सोमवार दि. २१ पासून प्रमुख आगारातून लांब फेऱ्यांसाठी रातराणी गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे सातारकरांची चांगली सोय होणार आहे.
- सागर पळसुले,
विभाग नियंत्रक सातारा.
जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या फेऱ्या
२२५
रातराणी फेऱ्या
००
चालक
२२५
रातराणी
००