दत्ता यादव - सातारा -दरवर्षी नवीन वर्षाची चाहूल लागली की, अनेकजण वेगळा काही तरी संकल्प करतात. मात्र, हा संकल्प पूर्ण होतो की नाही, हा इथे विषय नाही; परंतु संकल्प केला ना म्हणजे बस्स.. असं म्हणणारी बरीच माणसं भेटतील. त्यापैकीच एक म्हणजे, कधी जिमची पायरीही न चढलेल्या काहींनी म्हणजे ढेरपोट्यांनी यंदा आपले पोट कमी करण्याचा आगळावेगळा आणि हटके संकल्प केलाय. अशा काही निवडक ढेरपोट्यांशी केलेली बातचीत...चित्रपटामध्येही ढेरपोट्या पोलिसांचे पात्र आपल्याला पाहायला मिळते. गमती-जमती करत गुन्हेगारांच्या पाठीमागे धावणाऱ्या ढेरपोट्या पोलिसाकडे पाहून प्रेक्षकवर्ग पोट धरून हसतो. मात्र, खरोखरच ज्याचे पोट अवाढव्य असते, त्यालाच माहिती असते, त्याच्या पोटाचे दुखणे काय असते ते. ढेरपोट्या व्यक्ती नातेवाईक व मित्रांमध्ये चेष्टेचा विषय असतो. त्यामुळे अशा ढेरपोट्यांना स्वत:ला अपमानित वाटते. घरातील लोक पोट कमी करण्यासाठी सल्ले देतात. कोणी जिमला जा, असा सल्ला देतात. मात्र, ज्याचे पोट पुढे आलेले असते, त्याला दुसऱ्याच्या सल्ल्याशिवाय चांगल्या दिवसाची वाट पाहात त्या दिवसांपासून तो पोट कमी करण्यासाठी मेहनत घेतो. यंदा नवीन वर्षाचा संकल्प म्हणून पोट कमी करण्याचा काहींनी संकल्प केलाय. व्यक्तिमत्त्व अगडबंब असले तरी ते जगजाहीर करणे कोणालाही न पटणारे आहे. त्यामुळे अशांना खरंतर धाडसीच म्हटले पाहिजे. सध्या सिक्स आणि एट पॅकचा जमाना आहे. मात्र, सिक्स पॅक नाही झाले तरी ढेरी तरी कमी व्हावी, अशी ढेरपोट्यांची अपेक्षा आहे.हा दुसऱ्यांदा संकल्पगेल्या वर्षीही मी जिमला जाण्याचा संकल्प केला होता. मात्र, काही दिवस गेलो आणि पुन्हा जिम बंद केली. त्यामुळे माझे वजन आता दुपटीने वाढले. पोटही मोठे दिसतेय. यंदा मात्र, पोट कमी करण्याचा संकल्प मोडणार नाही. वेळात वेळ काढून जिमला जाणारच. माझे पोट वाढल्यामुळे मला फारसी कामे करता येत नाहीत. यापुढे जिमला जाऊन सिक्स पॅक करणार आहे.- सतीश करंजे, -व्यावसायिक, सातारासध्या माझे वजन ९२ किलो आहे. माझ्या वयाच्या मानाने माझे वजन तिप्पट आहे. त्यामुळे यंदा नवीन वर्षाचा संकल्प म्हणजे माझे वजन आणि पोट कमी करण्याचा आहे. रोज सकाळी जिममध्ये जाऊन मी पोट कमी करण्यासाठी मेहनत घेणार आहे. माझ्या पोटामुळे मला स्वत:चाच राग येतो. जिथं जाईल तिथं लोक वेगळ्या नजरेने पाहत असतात. त्यामळे यंदा माझे पोट कमी करण्याचा निश्चित संकल्प आहे.- संजय सुतार, यादोगोपळ पेठ, साताराएक जानेवारीपासून नवीन वर्षातच मी जिमला जाणार आहे. पोट तर कमी करायचे आहेच; पण आरोग्यही महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिमला जाण्याचा संकल्प मोडणार नाही.- राहुल माने, शाहूपुरी, सातारा
संकल्पा‘पोटी’ अनेकांची वाटचाल जिमकडे!
By admin | Updated: January 1, 2015 00:06 IST