सांगली : येथील हनुमाननगरमधील गल्ली क्रमांक आठमधील ‘स्वाइन फ्लू’ संशयित दोन वर्षांच्या बालिकेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. दरम्यान, नव्याने तीन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मालगाव (ता. मिरज) येथील दोन वर्षांच्या मुलास स्वाइनची लागण झाली आहे. सांगलीच्या हनुमाननगर येथील हणमंत देवकर यांची मुलगी गेल्या काही दिवसांपासून ताप, खोकला व घसादुखीच्या आजाराने त्रस्त होती. तिच्यावर खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू होते; पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही. तिला स्वाइनची लागण झाल्याचा संशय उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांना आला. त्यामुळे त्यांनी मुलीस सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शुक्रवारी रात्री अकरा वाजता देवकर यांनी मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीला पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले. तातडीने उपचारही सुरू केले होते. मात्र, शनिवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. एवढ्या लहान मुलीचा मृत्यू झाल्याने शहरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलीच्या रक्त तपासणीचा अहवाल सोमवारपर्यंत प्राप्त होईल, असे स्वाइन फ्लू कक्ष अधिकारी सदाशिव व्हण्णणावर यांनी सांगितले. सिद्धेवाडी (ता. तासगाव) व मिरज येथील नव्याने दोन संशयित शनिवारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीला पाठविले आहेत. मालगाव येथील दोन वर्षांच्या मुलास स्वाइनची लागण झाल्याचे रक्त तपासणीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तीनही रुग्णांना ताप, सर्दी, खोकला व घसादुखीचा त्रास होता. त्यांनी खासगी रुग्णालयांत औषधोपचार घेतले होते. चार-पाच दिवसांपूर्वी स्वाइनचा एक संशयित रुग्ण सापडला नव्हता, परंतु गेल्या दोन दिवसांत दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा कामाला लागली आहे. आदेशाला कोलदांडा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांनी गेल्या आठवड्यात ‘स्वाइन’ संशयित रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांनी जबाबदारी टाळू नये, रुग्णालयात व्हेंटिलेटरची सोय असेल तरच रुग्णांवर उपचार करावेत, असा आदेश दिला होता. मात्र, या आदेशाला खासगी डॉक्टरांकडून कोलदांडा दाखविला जात असल्याचे चित्र आहे. शेवटच्याक्षणी हे डॉक्टर शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत आहेत; पण इथे दाखल झाल्यानंतर या रुग्णांचा मृत्यू होत आहे. स्वाइनचे संशयित रुग्ण वाढत असल्याने शहर आणि परिसरातील नागरिकांनी स्वाइन होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. ताप, सर्दी, खोकला आल्यास तातडीने रुग्णालयात जावे आणि औषधोपचार घ्यावेत, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे. रुग्णांनीही निष्काळजीपणा करू नये किंवा आजार अंगावर काढू नये. अन्यथा तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो, असा इशाराही या तज्ज्ञांकडून दिला जात आहे. (प्रतिनिधी)
सांगलीत ‘स्वाइन’ने बालिकेचा मृत्यू?
By admin | Updated: October 11, 2015 00:14 IST