सातारा : तंबाखू शरीरासाठी हानिकारक आहे, तरी भारतात प्रामुख्याने तरुणवर्गात तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण जास्त आहे. ९० टक्के फुप्फुसाचा कॅन्सर व इतर प्रकारचे कॅन्सर होण्याचे कारण हे धूम्रपान आहे. वर्षानुवर्षे तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा जास्त धोका आहे, असे प्रतिपादन डॉ. कैलाश सचदेव यांनी केले.
यंग जायंट ग्रुपच्या वतीने जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रुग्णांच्या श्वसनमार्गाला सूज येते. गंभीर स्वरूपाचा संसर्ग असेल तर न्यूमोनिया होतो, म्हणजे फुप्फुसांतल्या हवेसाठीच्या पोकळ्यांमध्ये द्रवपदार्थ साठू लागतात. त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो आणि शरीराला आॅक्सिजनचा पुरवठा कमी कमी होत जातो. तंबाखूमुळे छातीत दुखणे, हृदयविकार झटका येणे, रक्तवाहिन्यांचे विकार होणे इत्यादी रोग जडतात. जर धूम्रपान जास्त केले तर टीबीसुद्धा होऊ शकतो. हे सर्व टाळायचं असेल तर तंबाखूपासून तातडीने फारकत घेणं आवश्यक आहे.
या वेळी यंग जायंट ग्रुपचे सदस्य, पदाधिकारी कोविडचे नियम पाळून उपस्थित होते.