सध्याच्या काळात शेती बेभरवशाची होत आहे. उत्पादन घेण्यामध्ये अडचणी येत आहेत. असे आपण नेहमी ऐकतो. ज्याठिकाणी सिंचनाच्या सोयी उपलब्ध झालेल्या आहेत, अशा भागामध्ये शेतकऱ्यांचा कल ऊस पिकाकडे अधिक असतो. बरेच शेतकरी आले, हळद, भाजीपाला, फुले पिके यासारख्या नगदी पिकांकडे वळत आहेत.
राहुरी विद्यापीठाने रब्बी ज्वारीचे सुधारित वाण हे जमिनीच्या प्रतवारीनुसार वापरण्याची शिफारस केलेली आहे. यामध्ये भारी जमिनीसाठी फुले रेवती व वसुधा, मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा व चित्रा तसेच हलक्या जमिनीसाठी फुले अनुराधा, फुले माऊली हुरडयासाठी फुले मधुर, लाह्यांसाठी फुले पंचमी यासारखे सुधारित वाण विकसित केलेले आहेत. शेतकऱ्यांना विद्यापीठाचे बियाणे सहज उपलब्ध व्हावे, यासाठी कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्हयात विक्री केंद्र स्थापन केलेले आहेत. सातारा जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव येथे शेतकऱ्यांना मागणीनुसार बियाणे उपलब्ध करून दिले. २०२०-२१ रब्बी हंगामात यावर्षी कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या पीक प्रात्यक्षिकातील शेतकऱ्यांना बोरगाव केंद्रामार्फत फुले रेवती या वाणाचे बियाणे तसेच बीजप्रक्रियेसाठी जिवाणू खते वितरित करण्यात आली होती. तसेच शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठाचे पीक उत्पादन वाढीचे सुधारित तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी माहितीपत्रके पुरविण्यात आली.
जावली तालुक्यातील सोनगाव येथील शेतकरी साहेबराव मन्याबा चिकणे (रा. सोनगाव) यांनी हेक्टरी १०१ क्विंटल उच्चांकी उत्पादन घेऊन राज्यात रब्बी ज्वारी पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. वरखडवाडी येथील शेतकरी नितीन बाजीराव वरखडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.