सातारा : ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत हे रक्तदान झाले. रक्तदान करण्यासाठी लोकमत समुहातील कर्मचारी आणि सातारकरांनी गर्दी केली होती.रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते. रक्ताची गरज कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही क्षणी लागू शकते. अडचणीच्या काळात माणुसकीच्या नात्याने रक्तदान करणारी व्यक्ती परमेश्वरच मानली गेली आहे. परिणामी त्याचे महत्त्व आणि सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूह गेल्या वर्षीपासून राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करत आहे. बुधवारी, दि. २ रोजी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय आणि पारसनीस कॉलनीतील माउली चॅरिटेबल ट्रस्ट संचलित माउली ब्लड बँकेत रक्तदान करण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती.सातारा जिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासाठी डॉ. शिल्पा मोरे, अनिल भुंदे, गजानन कांबळे त्याचबरोबर माऊली ब्लड बँकेत डॉ. सुभाष पोतदार, रोहिणी माने, निर्मला देशमुख, सारंग आमणेकर, मंदार माटे, अनिता पाटोळे, एम. व्ही. पारंगे यांनी मोलाचे सहकार्य केले. (प्रतिनिधी)
रक्तदान शिबिराला प्रतिसाद
By admin | Updated: July 3, 2014 00:49 IST