सातारा : प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणि त्यामुळं होणारं जलप्रदूषण या विषयावर बोलताना अनेकांनी महामार्गावरील राजस्थानी मूर्तिकारांकडे बोट दाखवलं. यासंदर्भात या कलाकारांशी संपर्क साधला असता ‘ हमारा पलास्टर तो पिघलता है’ असा दावा त्यांनी केला. आम्ही ‘चॉक पावडर’च्या मूर्ती तयार करून आपण त्या जलरंगांनी रंगवितो, असं त्यांनी ‘लोकमत’ला सांगितलं.‘लोकमत’ने मंगळवार तळे परिसरातील प्रदूषणाचा विषय उचलून धरताच अनेकांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला असून, शाडूच्या गणेशमूर्तींची आगाऊ नोंदणी करणे सुरू झाले आहे. शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना जास्तीत जास्त संख्येनं करून प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील अनेक घटक सरसावले आहेत. सामाजिक आणि पर्यावरणवादी संस्थांनी सक्रिय पुढाकार घेऊन याविषयी प्रबोधन सुरू केलं आहे. पालिकेच्या सभागृहात घालेल्या बैठकीत शहरातील मूर्तिविक्रेत्यांनी महामार्गावर मिळणाऱ्या गणेशमूर्ती पर्यावरणासाठी अत्यंत घातक असतात, असा मुद्दा उपस्थित करून या मूर्ती शहरात आणू देऊ नयेत, अशी मागणी केली गेली होती. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या या मूर्तींना घातक रासायनिक रंग लावलेले असतात, असे प्रतिपादन अनेकांनी केले होते. या पार्श्वभूमीवर या विक्रेत्यांची भेट घेतली असता, त्यांनी मूर्ती प्लास्टरच्या असतात, ही बाब मान्य केली. मात्र, प्लास्टरमधील प्रकार त्यांनी सांगितले. नंबर एक, दोन आणि तीन असे हे प्रकार आहेत. तीन नंबरच्या प्लास्टरला ‘चॉक पावडर’ म्हणतात. आपण याच प्लास्टरच्या मूर्ती करतो, असे त्यांनी सांगितले. या मूर्ती पाण्यात विरघळणाऱ्या असतात, असा दावाही त्यांनी केला. ‘आमच्या मूर्तींना कोणताही रासायनिक रंग लावला जात नाही. नेल पॉलिशचा वापर केला जात नाही. सोनेरी रंग हाच एकमेव तैलरंग आम्ही वापरतो. बाकीचे सर्व जलरंग वापरतो. पाण्याचा स्पर्श होताच ते धुऊन निघतात,’ असे त्यांनी सांगितले. ‘मूर्ती रंगविताना ‘थिनर’चा वापर करीत नसल्यानेच आमच्या मूर्तींना चमक नसते. शिवाय पीतांबर रंगविताना वापरण्यात येणारी चकमकही आम्ही वापरत नाही,’ असे त्यांनी नमूद केले.या मूर्ती इतर मूर्तींच्या तुलनेत स्वस्त का असतात, असा प्रश्न विचारला असता मूर्तिकार म्हणाले, ‘गणेशमूर्तींच्या कारखान्यांमध्ये शिल्लक मूर्ती ठेवण्यास जागा असते. आम्ही भटकंती करून मूर्ती विकतो. शिल्लक मूर्ती ठेवायला जागा नसते. त्यामुळे दरात कमी-जास्त करून आम्ही विक्री करतो. शिवाय आमच्या मूर्ती कारखान्यात तयार होणाऱ्या मूर्तींपेक्षा पातळ असतात. त्यामुळे प्लास्टर कमी लागते.’ दरम्यान, या मूर्तिकारांचे म्हणणे खरे असल्याचे पडताळण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करतात. (लोकमत टीम)
हमारा प्लास्टर तो पिघलता है !
By admin | Updated: July 3, 2014 00:53 IST