शिरवळ : खंडाळा तालुक्यातील एका विवाहितेला रस्त्यामध्ये अडवून छेडछाड केल्याप्रकरणी खंडाळा न्यायालयाने एकाला दोषी ठरवित सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंड ठोठावला आहे. संतोष गेनबा भरगुडे (वय ३१, रा. पळशी, ता. खंडाळा ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना दि. १ जानेवारी २०१३ रोजी घडली होती. याबाबतची माहिती अशी, खंडाळा तालुक्यातील एका गावच्या हद्दीत एक विवाहिता शेतामध्ये जात होती. त्याठिकाणी संतोष भरगुडे हा आला. त्याने संबंधित विवाहितेचा रस्ता अडवत विनयभंग करण्याच्या उद्देशाने छेडछाड केली. पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यानंतर न्यायालयात खटला गेला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानत खंडाळा न्यायालयाचे न्यायाधीश एन. एन. जोशी यांनी संतोष गेनबा भरगुडे याला दोषी ठरवत सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता व्ही. व्ही. घनवट यांनी काम पाहिले. त्यांना प्रॉसिक्युशन स्कॉडचे हवालदार अविनाश नलावडे व सतीश इथापे यांनी सहकार्य केले. या घटनेचा तपास हवालदार महादेव नलावडे यांनी केला. (प्रतिनिधी)
विवाहितेची छेडछाड; युवकाला शिक्षा
By admin | Updated: April 19, 2015 00:36 IST