चरण : माणसाला साहित्याचे वेड असणे गरजेचे आहे. जोपर्यंत माणूस साहित्यामध्ये वेडा होत नाही, तोपर्यंत त्यांना साहित्य देता येत नाही. आज या युगात माणसाजवळ नुसता पैसा असून चालणार नाही, तर त्याची ओळख असणे गरजेचे आहे. साहित्य हे माणसाला वर्षानुवर्षे घडवत असते, एक नवा चेहरा जगासमोर आणत असते, असे प्रतिपादन शब्दरंग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले. पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथे शिराळा तालुका शब्दरंग साहित्य मंडळ आणि ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठव्या डोंगरी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले.सत्यजित देशमुख म्हणाले, ग्रामीण भागात साहित्य संमेलन होणे हे भाग्यच आहे. साहित्य संमेलनाने अनेक साहित्यिकांना आपले साहित्य मांडण्यासाठी आपल्या हक्काचे व्यासपीठ दिले आहे. या साहित्य संमेलनास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशी साहित्य संमेलने प्रत्येक ठिकाणी घेणे गरजेचे आहे. यावेळी माजी सभापती हणमंतराव पाटील, प्रा. शामराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार अशोक इंगवले, सुभाष कवडे, प्रदीप पाटील, दि. बा. पाटील, दीपा देशपांडे, श्रीकांत माने, चंद्रकांत देशमुखे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रा. प्रदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद, अंध कवी चंद्रकांत देशमुखे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन, तर प्रा. विश्वनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन पार पडले. परिसंवाद आणि कविसंमेलनास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्वागत शब्दरंग साहित्य मंडळाचे अध्यक्ष कवी वसंत पाटील यांनी केले. (वार्ताहर)अशी संमेलने ग्रामीण भागात व्हावीतपणुंब्रे वारुण येथील डोंगरी साहित्य संमेलनास प्रतिवर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशी साहित्य संमेलने ग्रामीण भागात झाली पाहिजेत, अशी प्रतिक्रिया साहित्य संमेलनाला आलेल्या लोकांतून होती.
माणसाची जडण-घडण साहित्याशिवाय अशक्य
By admin | Updated: January 20, 2015 23:35 IST