पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारापासून राजमार्गावरील तीन किमी अंतरावरील फुलांच्या हंगामात हजारो पांढऱ्या शुभ्र कमळांची पर्वणी देणाऱ्या कुमुदिनी तलावातील पाणी मार्चच्या उत्तर पंधरवड्यात पूर्णपणे आटले. या परिसरात पाच ते सहा वेळा मध्यम, दोन वेळा मुसळधार उन्हाळी पूर्व मान्सून तसेच तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. झालेल्या मुसळधार पावसामुळे कोरडा पडलेल्या कुमुदिनी तलावात पाणीसाठा वाढून तलाव पूर्णत: भरल्याने वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. या तलावालाच स्थानिक ग्रामस्थ सरवारतळे असे म्हणतात.
कुमुदिनी (पानभोपळी) नायफांडिस इंडिका ही वनस्पती कास पठारावरील महाबळेश्वर राजमार्गावर असणाऱ्या तलावात आढळते. म्हणून या तलावाला कुमुदिनी तळे नाव पडले. फुलांच्या हंगामात पांढऱ्या शुभ्र कमळांची पर्वणी तर फेब्रुवारी-मार्च अखेर हा तलाव वन्य पशुपक्ष्यांची तहान भागवतो. सातासमुद्रापार ओळख असलेल्या या कुमुदिनी तलावात भर उन्हाळ्यात पूर्णतः पाणीसाठा झाला आहे. याच तलावामध्ये सप्टेंबरदरम्यान नायफांडिस इंडिका (पानभोपळी) ही हजारो पांढरी शुभ्र कमळे फुलत असतात.
फोटो १८ पेट्री
कास तलावात पडलेल्या पावसामुळे कोरडा ठणठणीत कुमुदिनी तलाव फुल्ल भरला. (छाया -सागर चव्हाण)