विठ्ठल नलवडे - कातरखटाव खटाव तालुक्यात कातरखटाव म्हणून ओळखले जात असलेल्या गावाचे नाव सुमारे आठशे वर्षांपूर्वी कवठे होते. या कवठे गावचे ग्रामदैवत ‘कवठेश्वर’ होते. या वरूनच पुढे गावाला कातरपट्टे अन् त्यांचा अपभं्रश ‘कातरखटाव’ असा झाला. तो आजही त्याच नावाने ओळखला जातो. गावाच्या नावाबद्दल दंतकथा सांगितल्या जातात. कवठेच्या उत्तर बाजूने कवठाई नदी वाहते. हीच नदी येरळा नदीस मिळते. कवठेमध्ये शिवदास नावाचा गवळी शंभू महादेवाचा निस्सीम भक्त होता. त्याच्या आयुष्याची संध्याकाळ होत आली होती. दर सोमवारी शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या पायी वारीचा नियम सोडला नाही. अशाच एका सोमवारी भल्या पहाटे शिवदास उठला पाण्याची कावड घेऊन नदीवर आला स्रानसंध्या उरकली कावड पाण्याने भरली आणि ‘हर हर महादेव...’ म्हणून शिखर शिंगणापूरचा रस्ता धरला. त्याकाळी कवठे गावाच्या ‘कातरखटावच्या, उत्तरेस अरण्य होते. अशाच एका पहिल्या सोमवारी शिवदासानी शंभू महादेवाचा जप करीत शिखर शिंगणापूर गाठले कावडीतून कवठाई नदीचे पवित्र जलाचा शंभू महादेवास अभिषेक घातला आणि भक्तिभवाने दोन्ही हात जोडले. शंभू महादेव शिवदासाच्या अखंड भक्तीस प्रसन्न झाले. यावेळी ‘शंभू महादेव शिवदासला म्हणाले’ ‘बोल तुला काय हवं ते माग.’ तेव्हा शिवदास शंभू महादेवास म्हणाला, ‘नको फक्त तुच मला हवा आहेस.’ त्यावर शंभू महादेव शिवदासला म्हणाले, ‘आता तुला इतके लांबचे अंतर माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही. मीच तुझ्या गावी वास्तव्यास येतो; पण एक लक्षात ठेव तुझ्या गावापर्यंत जाईपर्यंत पाठीमागे बघायचे नाही.’शिवदासाने आपली कावड घेतली आणि आपल्या गावचा रस्ता धरला. शिवदास गावापासून हाकेच्या अंतरावर आला आणि त्याच्या मनात शंका आली ‘देव माझ्या पाठीमागे येईल का?’ आणि शिवदासाने पाठीमागे पाहिलेच. त्याला पाठीमागे कोणीच दिसले नाही, त्याला वाटले देवाने आपल्याला फसविले की काय, तो निराश होऊन आपल्या घरी पोहोचला. विचार करीत शिवदास झोपी गेला. ‘झोपेत शंभू महादेवांनी शिवदासास दृष्टांत दिला आणि सांगितले ‘तू ज्या ठिकाणी मागे वळून पाहिले त्या ठिकाणी मी गुप्त झालो. त्या ठिकाणी माझे शिवलिंग सापडेल.’ शिवदासला खडबडून जाग आली. शिवदासाने आपली बैलजोडी आणि नांगर घेऊन शंभू महादेवांनी दृष्टांत दिलेल्या ठिकाणी येऊन ‘शिव’नामाचा जप करीत जमीन नांगरण्यास सुरुवात केली. आणि अचानक भयंकर मोठा आवाज झाला आणि जमिनीतून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या त्याक्षणी नांगर सोन्याचा झाला. रक्ताचे रूपांतर पाण्यामध्ये झाले. आणि शिवलिंग वर आले. त्यावेळी शिवलिंगाची साळुंकी नांगराच्या फाळाने कातरली गेलीली दिसली. ‘त्यामुळे शिवलिंगास ‘कात्रेश्वर’ नावाने संबोधले गेले. त्याच वेळी कातरपट्टे, असे पुढे नाव पडले. पुढे-पुढे या शब्दाचा अपभ्रंश होत आजचे ‘कातरखटाव’ झाले.
कात्रेश्वरामुळे ‘कातरपट्टे’चं झालं कातरखटाव!
By admin | Updated: March 16, 2015 00:08 IST