सचिन काकडे-- सातारा---बालवयात अनाथपणाचे दु:ख काय असते, याचा अनुभव घेत रिमांड होममध्ये शिक्षण घेतलेल्या एका युवकानं आपल्या महाविद्यालयीन मुलांचा ग्रुप तयार केला अन् त्यांच्यापुढे अनाथ मुलांच्या आनंदासाठी आपण काही केले पाहिजे, अशी कल्पना मांडली. ही कल्पना मित्रांनाही आवडली अन् गु्रपमधील प्रत्येकाच्या वाढदिवशी रिमांडमधील मुलांना शालेय वस्तू, खाऊ वाटप करण्याबरोबरच हा ग्रुप चिमुकल्यांमध्ये रमताना दिसत आहे. शिवाजी कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या १५ ते २० विद्यार्थ्यांचा एक ग्रुप. एकत्र आल्यानंतर त्यांनी ‘माऊली सोशल सर्कल’ या नावाचा आपला ग्रुप तयार केला. या ग्रुपमधील एक विद्यार्थी म्हणजे आक्रम मणेर. आक्रमला एक जुळी बहीणही आहे. लहानपणीच डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या या भावंडांचे तिसरी ते चौथीपर्यंतचे शिक्षण येथील रिमांड होममध्येच झाले. त्या आठवणींनी आजही आक्रमचे डोळे पाणावतात.कष्टप्रद जीवन जगून आज ही भावंड शिक्षण घेत आहे. या ग्रुपमधील अमोल वाघमोडे या विद्यार्थ्याचा वाढदिवस २९ नोव्हेंबर रोजी साजरा झाला. मात्र, ‘माऊली ग्रुप’ ने हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून निरासग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य तर फुलवलेच तसेच आक्रमलाही एक सुखद धक्का दिला.या ग्रुपने प्रत्येकी तीनशे रुपये वर्गणी काढली. यानंतर त्यांनी एका छोटेखानी कार्यक्रमाद्वारे रिमांड होममधील १६० विद्यार्थ्यांना या पैशातून खरेदी केलेल्या वह्या, पेन व खाऊचे वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मात्र ओसंडून वाहत होता.याप्रसंगी अमोल वाघमोडे, मनिष करपे, प्रशांत सोनावले, आम्रक मणेर, मर्जिणा मणेर, अनिकेत चव्हाण, बालाजी गोडसे, प्रवीण पवार, राहुल आटपाडकर, ओंकार पाटील, अमोल गावडे, अभिजित पाटील, दिनेश खरात, सुधीर फडतरे, सुमीत गवळी, नीलेश गटकुळ, कमरुद्दीन सुतार, आकाश जाधव, प्रतीक्षा सोनावले उपस्थित होते. दररोज पुस्तकवाचन स्पर्धेच्या युगात ज्ञानामध्ये भर पडावी यासाठी ‘माउली सोशल सर्कल’ गु्रपने वाचन परंपरा जतन करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. ग्रुपमधील विद्यार्थी दररोज एकत्र येऊन एक तास वाचन करतात. एक विद्यार्थी वाचन करतो व इतर श्रवण करतात. ‘शिवाजी कोण होता’? या पुस्तकानंतर आता ‘छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य’ या पुस्तकाचे वाचन यांनी सुरु केले आहे. पुस्तकातील अकरा पाने दररोज वाचली जातात. ज्यांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरविले आहे, अशा मुलांचे जीवन किती कष्टप्रद असू शकते, ही कल्पनाही करू शकत नाही. वाढदिवस व अन्य बाबींसाठी आपण पैशांचा नेहमीच अपव्यय करतो. हे टाळून आमच्या ग्रुपने आज शेकडो मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. हा आनंद ‘त्या’ आनंदापेक्षा कितीतरी मोठा आहे. आमचे समाजकार्य असेच सुरु राहणार आहे.- मनीष करपे, विद्यार्थी
‘अनाथ’ होतो मी... आता मात्र ‘नाथ’ बनेन मी!
By admin | Updated: December 1, 2015 00:11 IST