मसूर : ‘गणेशोत्सव मंडळांनी चांगले कार्य करून सत्कारास पात्र व्हावे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचे पालन करावे,’ असे प्रतिपादन उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी केले.
मसूर येथे मसूर व भागातील गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीस मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मसूर पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सरपंच पंकज दीक्षित, कोनेगावचे सरपंच रमेश चव्हाण, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष नरेश माने, गोल्डन पवार, हवालदार अमोल देशमुख, पोलीसपाटील तिलोत्तमा वेल्हाळ, सौरव राजमाने यांची उपस्थिती होती.
अजय गोरड म्हणाले, ‘गतवर्षी कोरोना काळात गणेश मंडळांनी चांगले सहकार्य केले. याहीवर्षी ते अपेक्षित आहे. गणेशोत्सवाचे स्वरूप काळानुरूप बदलत आहे. दुसरी लाट ओसरली नाही, परंतु तिसऱ्या लाटेची दाहकता मोठी आहे. तेव्हा गर्दीला आमंत्रण देऊ नका. साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा. एक गाव, एक गणपतीसाठी सहकार्य करा.’
पोलीस निरीक्षक अनिल पाटील म्हणाले, ‘गणेशोत्सव काळात प्रशासनाचे नियम पाळावेत. आपापसात वाद घालू नये, मिरवणूक, महाप्रसाद, डॉल्बी, बँजो, डीजेला परवानगी नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.’
पंकज दीक्षित म्हणाले, ‘गणेशोत्सव मंडळांनी कोरोना जनजागृती संदेश, स्वच्छता आरोग्य याविषयीचे सामाजिक संदेश देणारे व्हिडिओ बनवावेत. उत्कृष्ट कलाकृतींना ५००१, ३००१, २००१ अशी तीन बक्षिसे दिली जातील.
अमोल देशमुख यांनी आभार मानले.
फोटो १०मसूर
मसूर परिसरातील गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन करताना अजय गोरड, अनिल पाटील, पंकज दीक्षित, नरेश माने उपस्थित होते. (छाया : जगन्नाथ कुंभार)