सातारा : मागील तीन महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत चालले आहेत; तर यापुढेही तेलाचा भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे महागाईच्या काळात सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान, मागील वर्षातील मार्च महिन्याचा व आताचा विचार करता, एक लिटरच्या खाद्यतेलाच्या पिशवीमागे ४० ते ६० रुपयांची वाढ झालेली आहे.
देशात खाद्यतेलाला मोठी मागणी असते. कोणताही पदार्थ बनवायचा झाला तर तेलाशिवाय पर्याय नसतो. तसेच सण, समारंभ, विवाह सोहळे, विविध कार्यक्रम अशामध्ये खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पण, भारतात खाद्यतेलाचे पाहिजे तेवढ्या प्रमाणात उत्पादन होत नाही. भारताची गरज भागविण्यासाठी बाहेरील देशातून खाद्यतेल आयात करावे लागते. या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारत आपल्या गरजेसाठी पाश्चात्त्य देशांतून ७० टक्के खाद्यतेलाची आयात करतो; तर ३० टक्के तेलाची निर्मिती ही भारतात होते.
सातारा जिल्ह्याचा विचार करता सूर्यफूल, शेंगदाणा, सोयबीन, पामतेल या खाद्यतेलांचा वापर खाण्यासाठी करण्यात येतो. मात्र, सोयाबीन आणि सूर्यफूल तेल अधिक वापरण्यात येते. मागील वर्षभरात या खाद्यतेलांच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. यामुळे सामान्यांना खर्चाचा ताळमेळ घालताना मोठी कसरत करावी लागत आहे.
खाद्यतेलाच्या एक लिटरच्या पिशवीबरोबर १५ किलोच्या डब्याचेही दर वाढले आहेत. मागील आठवड्यात १५ किलोंचा सूर्यफूल तेलाचा डबा २५०० ते २५५०, सोयाबीन २१०० ते २२००; तर शेंगदाणा तेलाचा डबा २४०० ते २६०० पर्यंत होता. मागील वर्षभराचा विचार करता डब्यामागे सरासरी ८०० रुपये वाढले आहेत.
..........................
खाद्यतेलाचा दर (प्रतिलिटर)
मार्च २०२० मार्च २०२१
सूर्यफूल १०० १७०
शेंगदाणा १४० १७०
पामतेल ८० १२०
सोयाबीन ९० १३५
राईस ब्रॅन १२० १५०
....................................
सूर्यफूल १७०
पामतेल १२०
......................
मार्चमध्ये उच्चांकी वाढ
मागील तीन महिन्यांत तेलाचे दर वाढले आहे; पण, मार्च महिन्यात उच्चांकी वाढ झाल्याचे दिसून आले.
..............................................
कशामुळे झाली भाववाढ...
भारतात जवळपास ७० टक्के खाद्यतेल आयात होते; तर कोरोनामुळे पाश्चात्त्य देशातील अर्थव्यवस्था ढासळली आहे. संबंधित देशांनी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी निर्यात कर वाढविला. त्यामुळे भारतात खाद्यतेलांचा दर वाढतच चालला आहे.
....................................................
गृहिणींच्या प्रतिक्रिया...
प्रत्येक घराचा महिन्याचा खर्च ठरलेला असतो. त्यानुसार नियोजन होते. पण, गेल्या काही महिन्यांत खाद्यतेलाचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नियोजन कोलमडले आहे. काटकसर करावी लागत आहे. खाद्यतेलाचे दर कमी करून दिलासा देण्याची गरज आहे.
- शीतल देशमुख, सातारा
.........................
कोरोना विषाणू आल्यापासून महागाईची हद्दच झाली आहे. इंधन असो किंवा सिलिंडर टाकी यांचे भाव वाढतच चालले आहेत. त्यातच खाद्यतेलाचा दर वाढल्याने भाजीला फोडणी देताना विचार करावा लागतो. सर्वसामान्यांना तर याचा मोठा फटका बसलेला आहे.
- पुष्पलता आटपाडकर, कुरणेवाडी
.......................................
महागाई वाढतच चालली आहे. यातून सामान्य तसेच ज्यांची आर्थिक स्थिती बरी आहे, तेही सुटलेले नाहीत. आता तर खाद्यतेलाचा दर सतत उच्चांक करीत आहे. यामुळे किचन बजेट खऱ्या अर्थाने कोलमडले आहे. वर्षभरात तेल पिशवीमागे ५० रुपयांची वाढ झाली आहे.
- शालन पाटील, सातारा
...........................................................
भारतात परदेशातून ७० टक्के खाद्यतेल आयात होते. त्यामुळे तेलावर आपण बहुतांश पाश्चात्त्य देशांवर अवलंबून आहे. खाद्यतेल उत्पादक देशांनी कोरोनामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी निर्यात कर वाढविला आहे. यामुळे आपल्याकडे दर वाढत चालले आहेत.
- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी
...................................................................................