कऱ्हाड : गणेशोत्सवाचा ‘साज’ कायम असला तरी गत काही वर्षात या उत्सवाचा ‘बाज’ नक्कीच बदललाय. दिखाऊपेक्षा पर्यावरणपूरक आणि समाजप्रबोधनात्मक उपक्रम या उत्सवात राबविले जातायत. कऱ्हाडातही या चळवळीला बळकटी मिळत असून यंदा तब्बल पाच हजार घरात पर्यावरणपूरक गणराय विराजमान होणार आहेत.
कऱ्हाडात पर्यावरपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेसह ‘एन्व्हायरो फ्रेन्डस नेचर क्लब’कडून गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मूर्तिकारांना शाडूच्या मूर्ती बनविण्यासाठी प्रोत्साहित करण्याबरोबरच घरोघरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातायत. सुमारे पाच वर्षांपूर्वी सुरू झालेली ही चळवळ आता सर्वसमावेशक झाली असून शहरातील मुर्तिकारांकडून शाडूच्या मूर्ती बनविण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसते. मूर्ती प्रतिष्ठापनेसोबतच सजावट आणि विसर्जनावेळीही पर्यावरणाला अनुसरून उपक्रम राबविण्याचा प्रयत्न सर्वांकडून होतोय.
गत काही वर्षांपासून शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना तसेच मूर्तींचे जलकुंडात विसर्जन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवात कऱ्हाडकर एक पाऊल पुढे टाकीत आहेत.
- चौकट
केसराचा वापर
शाडूच्या गणेशमूर्ती हाताने बनविल्या जातात. या मूर्तींमध्ये मजबूती रहावी, पाणी टिकून रहावे, यासाठी नारळाच्या केसरांचा प्रामुख्याने वापर केला जातो.
- चौकट (फोटो : ०२केआरडी०१)
६ इंचापासून ४ फुटापर्यंत मूर्ती
कऱ्हाडातील कारागिरांनी शाडूच्या मातीपासून ६ इंच ते ४ फुट उंचीपर्यंतच्या शेकडो मूर्ती बनविल्या आहेत. त्यापैकी ९० टक्के मूर्तींचे बुकिंग झाले असल्याचे मूर्तिकार सांगतात.
- चौकट
एक फुटाची मूर्ती दीड ते अडीच हजार
शाडूच्या मातीपासून बनविलेल्या मूर्तींपैकी एक फुटाची साचातील मूर्ती सुमारे दीड हजार तर हाताने बनविलेल्या मूर्तीची किंमत अडीच हजार रुपये आहे.
- चौकट
४० किलोची बॅग ३३० रुपयाला
कऱ्हाडच्या मूर्तिकारांनी यंदा मे महिन्यात भावनगर-गुजरातहून ११० टन शाडूची माती मागविली होती. या मातीची ४० किलोची एक बॅग कारागिरांना ३१० ते ३३० रुपयांना मिळाली.
- चौकट
मूर्तीची वैशिष्ट्ये
१) वजन जास्त
२) पाण्यात बुडते
३) त्वरित विरघळते
४) रसायनविरहीत रंग
५) पाणीयुक्त रंगांचा वापर
६) मातीचा खत म्हणून वापर
- चौकट
चार वर्षांतील मूर्ती दान
२०१७ : ३,६२८
२०१८ : ४,८९८
२०१९ : ६,९६०
२०२० : १४,७७७
- चौकट
तयार मूर्तींपैकी...
७२ टक्के : शाडूच्या मूर्ती
२८ टक्के : प्लास्टरच्या मूर्ती
- कोट
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कऱ्हाडातील कारागिरांनी यंदा पाच हजारावर शाडूच्या मूर्ती बनविल्या आहेत. या मूर्तींना मागणीही जास्त आहे. चार हजारावर मूर्तींचे बुकिंग झाले असून शुक्रवारी पालिकेने ऑनलाइन कार्यशाळा घेतली आहे. त्यामध्ये मी शाडूच्या मूर्ती कशा बनवायच्या, हे नागरिकांना शिकविणार आहे.
- महेश कुंभार
मूर्तिकार, कऱ्हाड
- कोट
पाणी प्रदूषणाचा विचार करता नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. शाडूच्या मूर्तींना सध्या मागणी वाढली असून ही बाब समाधानकारक आहे. एन्व्हायरो क्लबच्या माध्यमातून त्यासाठी आम्ही जनजागृती करीत आहोत.
- जालिंदर काशिद
अध्यक्ष, एन्व्हायरो क्लब
फोटो : ०२केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाडातील मूर्तिकारांनी यंदा मोठ्या प्रमाणावर शाडूच्या आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या आहेत.