फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागातील माळरानावर मुळीकवाडी येथील तरुण शेतकरी लहुराज महादेव मोहिते यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करीत असताना चाळीस गुंठ्यात काशी भोपळ्याचे २२ टन उत्पादन घेतले आहे. भोपळ्याला ठिबक सिंचनने पाणी दिल्याने उत्पादन चांगले असून ८० दिवसांत १ लाख ८० हजार रुपयांचा फायदा झाला आहे. फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागातील मुळीकवाडी येथील जमीन माळरान आहे. त्यामुळे बहुतांश लोक मुंबईला चाकरमानी; मुळीकवाडी ओढ्यावर १९७२ च्या दरम्यान मोठे धरण झाले. यामुळे थोड्या प्रमाणात शेती बागायत झाली; परंतु कमी पर्जन्यमानामुळे धरणात पाणीसाठा अल्प होऊ लागला. त्यानंतर धोेम-बलकवडी कालव्यातून पाणी सोडल्याने साठा होऊ लागला. येथील लहुराज मोहिते यांनी नोकरीच्या मागे न लागता माळरान शेतीची सपाटीकरण केले. शेणखत व रासायनिक खते टाकून ४० गुंठे शेतात ६ फूट रुंदीवर सरी टाकून तीन फूट अंतर ठेवून १ किलो बियाणे टोकणपद्धतीने लावून ठिबक सिंचनद्वारे पाणी सोडले. पहिला डोस ५० किलो नत्र, १०० किलो स्फूरद, १०० किलो पालाश, मायोक्रोटोन १० किलो, सेकंडरी १०० किलोचा पहिला डोस दिला.४५ दिवसांनंतर दुसरा डोस देऊन औषधाची फवारणी केली. बियाणे, शेणखत, रासायनिक खते, औषधे मिळून ३६ हजार रुपये मजुरीसह खर्च आला. ८५ दिवसांनंतर काशी भोपळा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती विक्रीसाठी नेला असता २२ टन वजन भरले. एका किलोचा सरासरी दर सात ते आठ रुपये प्रतिकिलो मिळाला. एकूण उत्पन्न १ लाख ८० हजार रुपये नफा ८० दिवसांत मिळाला. कमी पाणी वापर करून जादा नफा मिळाल्याने त्यांचे कौतुक होत असून, एकत्र कुटुंबपद्धतीमुळे मजुरीवर खर्च कमी झाला आहे. फलटण तालुक्याच्या मुळीकवाडी माळरानावर आमची जमीन आहे, हे सांगायला लाज वाटत असे. १९७२ मध्ये मुळीकवाडीत धरण झाल्यानंतर नोकरी करत असताना धरणातील पाण्याचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला. धरणापासून दोन किलोमीटर अंतरावर विहिरीच्या साह्याने शेतीला पाणी उपलब्ध करून प्रत्येक हंगामात काकडी, टोमॅटो, दोडका, भेंडी असे वेगळी पिके घेतली आहेत. यावर्षी काशी भोपळ्याची लागण करून ८० दिवसांत १.८० लाख रुपये उत्पादन मिळविले आहे.-लहुराज मोहिते, शेतकरी मुळीकवाडी, ता. फलटणसूर्यकांत निंबाळकर
भोपळ्यातून दोन लाखांची कमाई
By admin | Updated: February 29, 2016 01:02 IST