लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोविडमुळे तब्बल दीड वर्षे बंद असलेली बाजारपेठ खुली झाली आहे. त्यामुळे सातारकरांची पावले पाणीपुरीवाल्या भय्याकडे आपसुकच वळू लागली आहेत. पण आवश्यक स्वच्छतेची काळजी न घेतल्याने ही पाणीपुरी टायफाईडला निमंत्रण देणारी ठरू शकते. म्हणून पाणीपुरीसह उघड्यावरील पदार्थ खाताना नागरिकांनी सावध राहावे, असे तज्ज्ञ सांगतात.
पावसाळ्यात बाहेरचे चटपटीत खाण्यावर अनेकांचा जोर असतो. मात्र, या दिवसांत तापमानातील घट, शरिरातील कमी होणारी उष्णता, त्याचवेळी या नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा शरिराचा प्रयत्न असतो. मात्र, या बदलातून अनेक प्रकारचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेरचे अन्नपदार्थ खाण्यापूर्वी तिथल्या स्वच्छतेची काळजी घेतली गेल्याचे पाहणे आवश्यक आहे.
दूषित अन्न किंवा पाण्याने हा आजार होतो. याला विषमज्वर असेही नाव आहे. पाणीपुरीतून हा आजार बळावतो. यातील पाणी हे उकळलेले नसते. दुसरं म्हणजे पाणीपुरी देताना विक्रेता वारंवार त्यात हात बुचकळत असतो. त्याच्या हाताची व नखातील घाण त्यात मिसळते. त्यामुळे पाणीपुरी खाताना खबरदारी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.
जिल्हा रूग्णालयातील टायफाईडचे रूग्ण :
जून : ७
जुलै : ९
ऑगस्ट : १४
आजाराची लक्षणे
मलमुत्राद्वारा दूषित पाण्यातून, माशा बसलेल्या अन्नातून, अस्वच्छ हाताद्वारे टायफाईडचे विषाणू शरिरात प्रवेश करतात. आतड्यात जाऊन त्या जीवाणूंची संख्या वाढते. त्यानंतर ते आपला विषारी प्रभाव दाखवू लागतात. त्यामुळे विषबाधा होते. यामुळे मळमळणे, उलट्या होणे, पोटात दुखणे, पोटात मुरडा मारणे, पाण्यासारखे पातळ हिरवट रंगाचे शौचाला होणे, रक्तमिश्रीत जुलाब होणे ही टायफाईडची मुख्य लक्षणे आहेत.
ही घ्या काळजी
शौचविधीनंतर हात, पाय साबणाने स्वच्छ धुवावेत.
घरामध्ये अन्न झाकून ठेवावे.
पाणी उकळून थंड करून प्यावे.
वैयक्तिक स्वच्छता पाळावी.
टायफाईडची लस घ्यावी.
पावसाळ्यात कच्च्या भाज्या, जास्त पिकलेली फळे टाळा.
.....................