सातारा : डोंगराळ भागात वसलेल्या सातारा शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी आणि धोके टाळण्यासाठी अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याची गरज आहे, ही बाब पालिकेला गोडोलीतील पुरानंतर पटली आहे. त्यामुळेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमण्याचा ठराव पालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. नंतर कायदेशीर बाबींची पूर्तता करून या समितीला ‘जैवविविधता समिती’चा दर्जा देण्यात येईल.वीस आॅगस्ट रोजी पाऊण तासात ८२ मिलीमीटर पाऊस पडल्याने शहरात उडालेली दाणादाण अनेक मानवनिर्मित बाबींवर बोट ठेवून गेली. ठिकठिकाणी पाणी साचले. सातारच्या इतिहासात असा पाऊस अनेकदा पडला आहे; मात्र पाणी कधीच साचून राहिले नव्हते. या निमित्ताने ओढ्यांवरील अतिक्रमणे, ओढ्यांचे मार्ग बदलणे, नैसर्गिक प्रवाह पाइपमध्ये बंदिस्त करणे असे अनेक मुद्दे चर्चिले गेले. याखेरीज शहरातील चढ-उतार, डोंगरांचा शेजार, माती आणि खडकांचा प्रकार, ठिकठिकाणची भूगर्भातील पाणीपातळी अशा अनेक घटकांचा विचार नगररचनेत व्हावा, यासाठी जैवविविधता समितीची स्थापना करणे गरजेचे असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. २००२ च्या जैवविविधता कायद्यान्वये स्थानिक स्वराज्य संस्थेत अशी समिती गरजेची असल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले होते.नगरविकास आघाडीचे प्रतोद अविनाश कदम यांनी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी याविषयी चर्चा केली. अनेक बाबतीत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे बापट यांनीही मान्य केले. जैवविविधता समितीबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करण्यास अवधी लागू शकतो; तथापि तोपर्यंत तज्ज्ञांची समिती तयार करावी आणि पुढे तिला जैवविविधता समितीचा दर्जा द्यावा, अशी चर्चा होऊन पालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत तसा ठराव मांडण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली. ठरावानंतर विविध ज्ञानशाखांची आणि त्यातील तज्ज्ञांची नावे निश्चित केली जातील. भूगर्भशास्त्र, जलस्रोत, भूरचनाशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, समाजशास्त्र, आपत्कालीन व्यवस्थापन आदी शाखांमधील तज्ज्ञ या समितीत असणे शक्य आहे. (प्रतिनिधी)शहराच्या काही भागांत भूगर्भजलपातळी अधिक असल्याने त्या ठिकाणी पर्जन्यजल पुनर्भरणाचे प्रकल्प करू नयेत, असा उलट सल्ला देण्याचीही वेळ येते, अशी शहराची भौगोलिक, नैसर्गिक स्थिती आहे. अशा स्थितीत तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा असून, तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याचा निर्णय आता घ्यावाच लागणार आहे.- अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा पालिकातज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याचा ठराव पालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी मांडण्यात येईल. मंजुरीनंतर कोणकोणत्या क्षेत्रांतील तज्ज्ञांची निवड करायची, याचा निर्णय घेण्यात येईल. हे तज्ज्ञ केवळ सल्ले देण्याची क्षमता असणारेच नव्हे तर पुढाकार घेऊन काम करणारे असावेत, असा प्रयत्न केला जाईल.- अविनाश कदम, पक्षप्रतोद, नगरविकास आघाडी
पालिका नेमणार तज्ज्ञांची समिती--लोकमत इफेक्ट...
By admin | Updated: August 27, 2014 23:30 IST