सातारा : कोणत्याही टोळक्याने जर महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांना त्रास दिला तर त्याची तक्रार थेट महाविद्यालय प्रशासन अथवा या शिस्त समितीकडे करावी. या टोळीत जे कोणी असतील, त्यांची गय केली जाणार नाही, असा परखड इशारा रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गणेश ठाकूर यांनी दिला.रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक महाविद्यालयात ‘महाविद्यालयीन शिस्त समिती’ आहे. ही समिती महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये अथवा बाहेर घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने तक्रार आली तर कारवाईचा निर्णय घेते. मात्र, या समितीकडेच तक्रारी येत नसल्याने ही समितीच बिनकामाची बनली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील वाय. सी. कॉलेज, डी. जी. कॉलेज, आझाद कॉलेज आॅफ एज्युकेशन, शिवाजी कॉलेज परिसरात विद्यार्थी, विद्यार्थिनींना त्रास देण्याचे नित्याचेच बनले आहे. परिणामी येथे अनेकदा वाद-विवादाचे प्रसंग घडण्याबरोबरच मारामारीचे प्रकारही घडले आहेत. महाविद्यालय प्रशासन मात्र आवारात घडले असेल तर आम्ही कारवाई करू, मात्र आवाराच्या बाहेर घडले असेल तर त्याची जबाबदारी आमची नाही, असे सांगत जबाबदारी झटकून टाकत आहे.‘रयत’च्या महाविद्यालयांमध्ये असणाऱ्या शिस्त समितीकडे अनेकदा तक्रारी येतात. तक्रारदार तसेच ज्याने अन्याय केला आहे, अशांना समितीपुढे उभे केले जाते. दोघांचे म्हणणे ऐकून ही समिती आपला निर्णय देत असते. मात्र अलीकडच्या काही घटनांच्या अनुषंगाने तक्रारीच आलेल्या नाहीत. त्यामुळे कारवाई अथवा पोलिसांत तक्रार देता येत नसल्याचे महाविद्यालयांचे म्हणणे आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अॅड. रावसाहेब शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना या प्रकाराची माहिती नव्हती. त्यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगतच महाविद्यालयीन प्रशासन अशा टोळ्यांवर तत्काळ कारवाई करेल, असे सांगितले. दरम्यान, या अनुषंगाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार डॉ. अनिल पाटील यांच्याकडे आहेत. त्यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्याची ग्वाहीही अॅड. शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)पोलिसांकडून सहकार्याची अपेक्षारयत शिक्षण संस्थेने पोलिसांकडून सहकार्याची अपेक्षा केली आहे. या अनुषंगाने सचिव डॉ. गणेश ठाकूर म्हणाले, ‘महाविद्यालय कॅम्पसमध्ये टोळ्यांची दादागिरी नसते. महाविद्यालय सुटल्यानंतर बाहेर गुंडगिरी करणारे युवक त्रास देत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाविद्यालय सुरू होताना आणि सुटताना येथे पोलिसांनी पेट्रोलिंग केले तरी खूप फरक पडेल.’रयतच्या कोणत्याही महाविद्यालयात आम्ही असले प्रकार कधीही खपवून घेणार नाही. मुलांनीही थोडे धाडसी बनावे. त्यांनी तक्रार केली तरच आम्ही पुढील कारवाई करू शकणार आहे. तक्रार आली तर मागे-पुढे न पाहता अशा गुंड प्रवृत्तीच्या युवकांना आम्ही महाविद्यालयातून कायमचे काढून टाकू.- डॉ. गणेश ठाकूर, सचिव, रयत शिक्षण संस्थाबुरुंगलेच्या काळात बेशिस्तपणा वाढला...‘रयत’च्या सचिवपदी कार्यरत असताना डॉ. अशोक भोईटे असताना त्यांच्या काळात कधी अशा टोळ्यांची दादागिरी चालली नाही. ज्यांनी केली त्यांना प्रसादही मिळाला. तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी अशा टोळ्यांचा चांगलाच बंदोबस्त केला. भोईटेंनंतर डॉ. जे. जी. जाधव आले. त्यांनीही कधी असले प्रकार चालू दिले नाहीत. डॉ. अरविंद बुरुंगले आले आणि त्यांनी राजकीय कार्यकर्ते सांभाळण्याच्या प्रयत्नात दुर्लक्ष केले आणि दादागिरी, युवकांचा धुमाकूळ असले प्रकार वाढले. त्यांच्याच काळात अनेक युवकांच्या टोळ्यांचे फावले आणि मारामारीचे प्रमाण वाढले. आता सचिवपदी डॉ. गणेश ठाकूर आले आहेत. त्यांनी या ‘रयत’च्या कॅम्पसमधील वातावरण भयमुक्त करावे, अशी मागणी होत आहे.कॉलेज सुरू होताना आणि सुटताना साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. छेडछाड होत असेल तर मुलींनी स्वत:हून पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा.- अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक
महाविद्यालय म्हणते, ‘तक्रार करा !’
By admin | Updated: August 24, 2014 22:37 IST