कवठे : ऊसतोडणीची उचल घेऊनही कामावर न आलेल्या तरुण मजुराचा मुकादमाने खून केल्याची घटना वाई तालुक्यातील खोलवडी येथे घडली. अशोक शंकरराव गाभूड असे या मजुराचे नाव असून, तो मूळचा औरंगाबाद जिल्ह्यातील विहामांडवा गावचा आहे. याप्रकरणी भुर्इंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मुकादमास ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या मुकादमाचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. याबाबत भुर्इंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खोलवडी येथे एकाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी भुर्इंज प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. हा मृतदेह अशोक गाभूड याचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नातेवाइकांना बोलावण्यात आले. शवविच्छेदनादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांना संशय आल्याने याची कल्पना पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे आणि सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना देण्यात आली. हा खूनच असल्याचा उलगडा झाल्यानंतर तपासाची सूत्रे हलली.दरम्यान, याप्रकरणी राजेंद्र ऊर्फ मसूरराज शंकरराव गाभूड (वय २८) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ऊसतोडणी मुकादम जगन्नाथ काकडे, हरिभाऊ लांडे या दोघांकडून अशोक शंकरराव गाभूड (वय २६, रा. विहामांडवा, ता. पैठण, जि. औरंगाबाद) याने एक लाख रुपये उचल म्हणून घेतले होते. मात्र, तोडणी सुरू झाल्यानंतरही गाभूड न आल्यामुळे काकडे आणि लांडे या दोघांनी त्याला विहामांडवा येथे जाऊन खोलवडी येथे आणले. मात्र, गाभूड याने कामच केले नाही. त्यामुळे काकडे आणि लांडे यांनी मंगळवारी गाभूड यास बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात काठीने जोरदार प्रहार केला. यात तो जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुकादम जगन्नाथ काकडे यास ताब्यात घेण्यात आले असून दुसरा मुकादम लांडे याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.दरम्यान, रात्री उशिरा अशोकचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. येथून तो विहामांडवा येथे नेण्यात आला. खून झालेला अशोक आणि मुकादम एकमेकांचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येते. (वार्ताहर)
ऊसतोडणी मजुराचा खोलवडीत खून
By admin | Updated: December 31, 2014 23:57 IST