खंडाळा : पर्यावरण संतुलन आणि संवर्धन ही भविष्याची गरज ओळखून खंडाळ्यातील सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतले आहेत. खंबाटकी घाटातील जंगलात बांध घालून पर्यावरण संवर्धन करण्यासह वन्यप्राणी आणि पशुपक्ष्यांच्या पाण्याची व्यवस्था कृत्रिम जलसाठे तयार करून करण्यात आली आहे. या जलसाठ्यात पाणी साठविण्यासाठी तरुणाई मेहनत घेत आहे. त्यामुळे वृक्षराई व वन्यप्राण्यांना जीवदान मिळणार आहे.
बदलत्या काळात पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. मानवाचे जीवन सुसह्य करावयाचे असल्यास पर्यावरणाचे संतुलन राखणे आवश्यक आहे, ही बाब लक्षात घेऊन खंडाळ्यातील विविध सामाजिक संघटनांच्या तरुणांनी एकत्र येऊन काही उपक्रम हाती घेतले आहेत. याचाच भाग म्हणून खंबाटकी घाट परिसरातील हरेश्वर पायथ्याजवळील पुरातन भैरवनाथ मंदिर येथे श्रमदानातून दगडी बांध घालण्यात आले आहेत. खंबाटकी परिसरात प्रत्येक रविवारी श्रमदान करण्यासह बंधारे निर्माण करणे, वृक्षरोपण करणे, वन्यप्राण्यांसाठी वनतळी, वणवामुक्त घाट, प्लास्टिक हटाव हे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यानुसार या भागात ठिकठिकाणी वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे येथील वन्यजिवांना उन्हाळ्यातही तग धरून राहण्यास मदत होणार आहे. सध्या या पाणवठ्यावर असलेल्या कृत्रिम जलसाठ्यात प्रत्येक आठवड्यात पाणी भरून ठेवण्यासाठी तरुणाई काम करीत आहे.
(चौकट..)
वन्यजिवांसाठी आटापिटा .....
खंबाटकी घाट परिसरात झाडांच्या परिसरात जागोजागी वनतळी तयार केली असून, त्यासाठी छोट्या दगडांपासून व मातीपासून छोटी तळी तयार केली आहेत. त्या शेततळ्यांसाठी वापरले जाणारे प्लास्टिक कागद वापरून वनतळी केली आहेत, तर काही जागी सिमेंटची भांडी बसविली आहेत. त्यामध्ये बाहेरून कॅनने पाणी आणून ओतले जात आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची तहान भागत आहे.
(कोट..)
निसर्गाची हानी झाल्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. जीव वाचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या भागातील पाणी सध्या आटले असल्याने पाण्याची कमतरता आहे. जंगल भागातील जलसाठे नष्ट झाले आहेत. त्यामुळे हे उपक्रम हाती घेतले आहेत.
- संदीप ननावरे, पर्यावरणप्रेमी, हरेश्वर संवर्धन
०९खंडाळा
फोटो : खंबाटकी घाटात डोंगर भागात छोटे बांध व वनतळी तयार करून पाण्याची व्यवस्था केली आहे, त्यात पाणी भरताना तरुण जमले आहेत.