वाठार स्टेशन : शेती पंपाची वीज तोडू नका, शेतकऱ्यांना सहकार्य करा. अशा सूचना सरकार देत असताना या सूचना पायदळी तुडवत अगोदर ७० टक्के थकबाकी भरा तरच वीज सुरू असा फतवा महावितरणच्या वाठार स्टेशन कार्यालयाने काढला आहे. यातच येथील फडतरवाडी, देऊर गावातील शेती पंपाना वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर आठ दिवसांपूर्वी जळाल्याने पिके धोक्यात आली आहे.वाठार स्टेशन महावितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध गावांत महावितरणच्या अनेक समस्या आहेत. फडतरवाडी गावातील ट्रान्सफॉर्मर २८ नोव्हेंबर रोजी जळाला असून अद्याप याची दुरुस्ती झाली नाही. याठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांकडे कसलीही थकबाकी नाही. असे असताना वीजपुरवठा पूर्वरत न झाल्याने कांदा, हरभरा, ज्वारी, गहू ही पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. याबाबत महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महावितरणने या संदर्भात तत्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)
शासन म्हणतंय वीज जोडा; अधिकारी म्हणतायत तोडा
By admin | Updated: December 2, 2014 23:19 IST