पाटण तालुक्यातील वाढती लोकसंख्या, गावांचा होत असलेला विस्तार आणि त्या प्रमाणात अपुरी पडत असलेली पोलीस यंत्रणा यामुळे मल्हारपेठला नवीन पोलीस ठाणे मंजूर करण्यात यावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्याला शासनाने ७ ऑक्टोबर २०२० रोजी मान्यता दिली. त्यानुसार सातारा पोलीस अधीक्षकांच्या आस्थापनेवरील पाटण पोलीस ठाणे व उंब्रज पोलीस ठाणे यांचे विभाजन करून मल्हारपेठ दूरक्षेत्र, चाफळ दूरक्षेत्र आणि चाफळ दूरक्षेत्राचे उन्नतीकरण करून नवीन मल्हारपेठ पोलीस ठाणे निर्माण करण्यास मंजुरी दिली. त्याचा भूमिपूजन सोहळा २४ जून २०१९ रोजी पार पडला होता. या समारंभासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती लावली होती.
मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्राची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी उभ्या राहत असलेल्या पोलीस ठाण्याच्या नवीन सुसज्ज इमारतीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या पोलीस ठाण्याचा कारभार सुरू झाला आहे. नवीन मल्हारपेठ पोलीस ठाण्याची अधिसूचना निर्गमित करण्यात आली असून, या पोलीस ठाण्याअंतर्गत ५२ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
- चौकट
... असे आहे मनुष्यबळ
१ : सहायक पोलीस निरीक्षक
१ : पोलीस उपनिरीक्षक
३ : सहायक उपनिरीक्षक
४ : हवालदार
७ : पोलीस नाईक
१४ : पोलीस शिपाई
३० : एकूण