दिघंची : आजपर्यंत आटपाडी तालुक्यावर राजकीयदृष्ट्या अन्याय झाला असून, आता वेळ आली आहे तालुक्यातील जनतेने एकसंध होण्याची. यंदा आमदार आटपाडी तालुक्याचाच झाला पाहिजे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी येथे केले.बाबासाहेब देशमुख बँकेच्या दिघंची (ता. आटपाडी) शाखेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आज (सोमवार) पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.पाटील म्हणाले की, परिसरातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने १९९५ मध्ये टेंभू पाणी योजनेच्या पूर्ततेसाठी राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भाजप, शिवसेनेच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला व ही योजना मंजूर करून घेतली. त्यामुळे या योजनेचे खरे जनक राजेंद्रअण्णा देशमुखच आहेत. आटपाडीने आतापर्यंत खूपच सोसले आहे. मात्र या तालुक्याने आपला स्वाभिमान कधीही गहाण ठेवला नाही. राष्ट्रवादी पक्षाला भक्कम ताकद दिली. आज संघर्षाची फळे चाखण्याची वेळ आली आहे. मतभेद बाजूला ठेवून एकसंधपणे अमरसिंह देशमुख यांना बळ द्यावे. राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले की, आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला टाळी दिली. पक्षाचे तिकीट नसेल, तर अमरसिंह देशमुख यांची अपक्ष उमेदवारी निश्चित आहे. टेंभू व उरमोडी धरणाचे पाणी राजेवाडी तलावामध्ये सोडावे. त्यामुळे दिघंची परिसरामधील शेतीच्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल.अमरसिंह देशमुख म्हणाले की, १९९० मध्ये तुम्हाला मदत केली. तेव्हा आमदार असतानाही माघार घेऊन तुम्हाला तीनवेळा मदत केली. आज आम्हाला मदत करण्याच्या वेळी तुम्ही आम्हाला फसविले. यावेळी गडी बदललाय. दोघांची मोळी बांधल्याशिवाय सोडणार नाही. कुस्ती निकालीच करणार. टेंभू पाणी योजना हा विषय संपला आहे. आता तुमचे काय? अशी टीका त्यांनी अनिल बाबर यांचा नामोल्लेख न करता केली.बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तानाजी पाटील, माणगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष भगवानअप्पा मोरे, पं. स. सभापती अलकाताई भोसले, उपसभापती बळवंत मोरे, सरपंच पांडुरंग शिंदे, बँकेचे उपाध्यक्ष जयवंत देशपांडे, व्यवस्थापक भगवंत आडमुठे, बँकेचे कर्मचारी, हर्षवर्धन देशमुख, अनिल पाठक, भाऊसाहेब गायकवाड, भागवत माळी, नारायण चवरे, विष्णुपंत चव्हाण उपस्थित होते. संचालक सावता पुसावळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
यंदा आटपाडीचाच आमदार होणे गरजेचे
By admin | Updated: August 25, 2014 22:09 IST