प्रवीण जगताप -लिंगनूर -कवठेमहांकाळसह महाराष्ट्राच्या सीमाभागातील व कर्नाटकातील पंधराहून अधिक गावांत सध्या आनंदाचे वातावरण आहे. सीमावर्ती असणाऱ्या खिळेगाव, पांडेगाव, शिरुरसह पंधरा गावे सध्या दुथडी भरून वाहणाऱ्या अग्रणीकडे डोळे भरून पाहात आहेत. दोन तपेच नव्हे, तर पंचवीस वर्षांतून प्रथमच असे पाणी वाहत असून, वाहणारे पाणी सलग आठवड्यापेक्षा अधिक काळ स्थिर वाहत आहे. त्यामुळे २५ वर्षांनंतर दुथडी वाहणारी अग्रणी पुन्हा जिवंत होईल का? अग्रणीकाठचा शिवार यंदाच नव्हे, तर प्रतिवर्षी फुलणार काय? अग्रणीकाठाला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार काय? असे आशादायक प्रश्न समस्त अग्रणीकाठाला पडत आहेत.अग्रणी नदीचा उगम खानापूरजवळ तामखडी येथील डोंगर परिसरात झाला आहे. पुढे हीच अग्रणी त्यानंतर पुढे मळणगाव, शिरढोण, हिंगणगाव, धुळगावमार्गे महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात कर्नाटकातून वाहत पुढे शिनाळ-तंगडीजवळ सप्तसागर येथे कृष्णेला मिळते. तेथेच या दोन नद्यांचा संगम होतो, तर कोकळे, करलहट्टी, आजूर या गावांतूनही वाहणाऱ्या नदीसही अग्रणीच संबोधण्यात येते व ही दुसरी अग्रणी पुढे शिरढोण-हिंगणगाव-पांडेगावमार्गे वाहणाऱ्या मुख्य अग्रणीस तावशीजवळ मिळते व पुढे मुख्य अग्रणी सप्तसागराजवळ कृष्णेला मिळते.अग्रणी नदीवर सावळज, शिरढोण, मळणगाव, विठुरायाचीवाडी, मोरगाव, धुळगाव या गावांत कोल्हापूर पद्धतीचे व तत्सम बंधारे बांधण्यात आले आहेत. शिरढोण परिसरासह महाराष्ट्रातील बंधारे पाण्याने भरले आहेत. त्याचबरोबर आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सांगली जिल्ह्यातील खानापूर व कवठेमहांकाळ तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे नदीकाठच्या गावांतून अग्रणी नदी दुथडी भरून वाहिली होती. हिंगणगाव ते कवठेमहांकाळदरम्यान असणाऱ्या पुलावरूनही धो-धो पाणी वाहिले होते. याचाच परिणाम म्हणून की काय, पुढे धुळगाव व कर्नाटकातील खोतवाडी, पांडेगाव, शिरूर, खिळेगाव, संबर्गी, नांगनूर, तावशी, शिवणूर, अब्याळ, मसरगुप्पी, मुरगुंडी, शिनाळ-तंगडी या गावांतूनही अग्रणी यंदा भरभरून वाहिली व वाहत आहे. त्यामुळे सीमावर्ती कर्नाटकातील या गावांतूनही आनंदाचे वातावरण आहे. येथील शेतीचा शिवार सध्या बहरू लागला आहे. बळिराजाही नदीचे पाणी पाहून समाधान व्यक्त करीत आहे.मात्र १९७८ पासून मागील पंचवीस वर्षांत अग्रणी नदीचे पाणी टिकून राहिलेच नाही. या भागाची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी अग्रणी जवळपास वीस वर्षे कोरडी ठणठणीत होती. या पंचवीस वर्षांत पाणी का टिकून राहिले नाही? येथील अखंड वाळू उपसा याचे मुख्य कारण मानले जाते. तरीही येथील वाळू उपसा अखंड सुरूच होता. महाराष्ट्रात मागील चार वर्षांत कोल्हापूर पद्धतीचे व तत्सम बंधारे याच नदीवर बांधले गेले. त्यामुळे येथील पाणी अडवा व पाणी जिरवा हे सूत्र राबविले जात आहे. पण १९७८ ते २०१३ पर्यंत सीमावर्ती कर्नाटकातील या १५ हून अधिक गावांना दरवर्षी दुष्काळ व दुष्काळ सदृश स्थितीचा सामना करावा लागला होता. पण या वर्षात काहीसे दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. या सीमावर्ती गावांतही प्रत्येक गावात दोन-तीन बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे येथील पाणी आता टिकू लागले आहे. आता गरज आहे येथील वाळू उपसा थांबविण्याची. येथील नदीपात्र खोल झाले आहे. मात्र पात्रात वाळूच अत्यल्प झाल्याने नदीतील पाणी टिकून राहणे व मुरणे अशक्य झाले आहे. त्यामुळे येथील नदीवरील बंधाऱ्यांची संख्या वाढविणे व वाळू उपसा थांबविणे, अशा पर्यायांची कायदेशीर मार्गातून व सक्तीने कडक अंमलबजावणी केल्यास पुन्हा परिसराला गतवैभव मिळणे शक्य होणार आहे. दुष्काळात अग्रणी होती जीवनदायिनी१९७२ च्या दुष्काळापूर्वी अग्रणी नदीला वैभवाचे दिवस होते. तत्कालीन परिस्थितीत अग्रणी नदी सहा महिने वाहायची. पाऊसकाळ जास्त झाल्यास जास्त काळ पाणी मिळायचे. त्यामुळे या नदीला जीवनदायिनी मानले जायचे. पण १९७२ च्या दुष्काळानंतर या परिस्थितीत बदल झाला. पुढे कोरड्या नदीपात्रातून प्रचंड वाळू उपसा होऊ लागला. पावसाळ्यातील पाणी टिके नासे झाले. पाऊसकाळही कमी झाला. त्यामुळे वीसहून अधिक वर्षे खडतर काळ म्हणून अग्रणीकाठाला सोसावा लागला आहे.
‘अग्रणी’ जिवंत होणार का?
By admin | Updated: September 11, 2014 00:11 IST