सांगली : वसंतदादा साखर कारखान्याच्या २१ एकर जागेत सुमारे ४५ प्लॉटस् पाडण्यात आले असून, ही जागा औद्योगिक वापरासाठी दिली जाणार आहे. तसे रेखांकन महापालिकेकडे मंजुरीसाठी दाखल झाले असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. येत्या चार दिवसात या रेखांकनाला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वसंतदादा साखर कारखान्याने गत गळीत हंगामातील गाळप केलेल्या उसाची ४५ कोटींची देणी अद्यापही दिलेली नाहीत. उसाची बिले भागविण्यासाठी साखर आयुक्तांच्या आदेशाने मिरज तहसीलदारांनी कारखान्याला मालमत्ता जप्तीची नोटीसही बजाविली आहे. शेतकऱ्यांच्या देण्यांसोबतच जिल्हा बँकेचेही ७८ कोटींचे कर्ज कारखान्यावर आहे. संचालक मंडळाने कारखान्याची २१ एकर जागा विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला सहकार विभागानेही मान्यता देत, जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती नियुक्ती केली आहे. कारखान्याची जागा दोन महिन्यात विकायची आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व परवाने घेणे बंधनकारक आहे. शासनाने एका लॉटमध्येच जागा विक्री करण्याचे आदेश दिले होते. पण लॉटमध्ये जागा विक्री केल्यास त्यातून मोठी रक्कम कारखान्याच्या हाती लागणार नाही. त्यासाठी प्लॉट पद्धतीने जागा विक्री करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यानुसार कारखान्याने प्लॉटचे रेखांकन महापालिकेकडे मंजुरीसाठी सादर केले आहे. या रेखांकनात ४५ प्लॉटस् पाडण्यात आले असून, ही जागा उद्योगधंद्यासाठीच वापरली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कारखान्याचा परिसर औद्योगिक वसाहती क्षेत्रात येतो. त्यामुळे ही जागा रहिवासी कारणासाठी वापरली जाणार की नाही, याविषयी उलटसुलट चर्चा होती. पण कारखान्याच्या वादात न पडता रेखांकनातच ‘औद्योगिक वापर’ असा उल्लेख केल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. रेखांकन मंजुरीचा प्रस्ताव सध्या नगररचना विभागाला प्राप्त झाला आहे. त्यावर ‘नगररचना’चे सहाय्यक संचालकांची सही होऊन प्राथमिक मान्यतेसाठी तो आयुक्तांना सादर होणार आहे. या प्रक्रियेसाठी चार दिवसांचा कालावधी लागेल. (प्रतिनिधी)
‘वसंतदादा’ची जागा उद्योगधंद्यासाठी!
By admin | Updated: September 5, 2014 00:10 IST