अविनाश कोळी - सांगली -नाट्यगृहांच्या फायर आॅडिट आणि तपासणीच्या अधिकाराबद्दल महापालिकेचा अग्निशमन विभागच अनभिज्ञ असल्याची धक्कादायक बाब बुधवारी निदर्शनास आली. नाट्यगृहांचे फायर आॅडिट आणि त्याच्या सहामाही अहवालाबाबत विचारल्यानंतर अग्निशमन अधिकारी शिवाजी दुधाळ म्हणाले की, ‘एकदा नियमाप्रमाणे फायर आॅडिट झाले आहे. त्यानंतर तपासणीचे काय झाले, आपल्याला माहीत नाही.’ वास्तविक महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन संरक्षक उपाययोजना २००६ नुसार फायर आॅडिट झाल्यानंतर वर्षातून दोनवेळा अशा अग्निशमन उपकरणांची तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी महापालिका अग्निशमन विभागाची आहे. महापालिकेलाच कायदा माहीत नसल्याने बिचाऱ्या नाट्यगृह व्यवस्थापनांनी तरी काय करायचे, असा सवाल उपस्थित होत आहे. फायर आॅडिट म्हणजे काय, महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन संरक्षक उपाययोजना कायद्यातील तरतुदी काय आहेत, याचा अभ्यास असलेला अधिकारीच महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे नाही. त्यामुळेच महापालिका क्षेत्रातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहांमधील सुरक्षा रामभरोसे आहे. सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृह, मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आणि मिरजेच्या बालगंधर्व नाट्यगृहांनी कितीवेळा आगप्रतिबंधक उपकरणांची तपासणी केली, याची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. नाट्यगृहांचा परिसर परवाना, सादरीकरण परवाना घेताना अग्निशमन विभागाकडून नाहरकत दाखला घेतला जातो. हा दाखला देताना तपासणी अहवाल नियमितपणे सादर होतात की नाही, याची तपासणी अग्निशमन अधिकाऱ्यांनी करायची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी अशी कोणतीही तपासणी केली नाही. एकदा फायर आॅडिट झाले म्हणजे काम संपले, असा समज त्यांनी करून घेतला आहे. सहामाही तपासणी अहवाल किती नाट्यगृहांनी सादर केले याविषयी दुधाळ यांच्याकडे चौकशी केली असता, असे कोणतेही अहवाल आपल्याकडे सादर झालेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वास्तविक ही जबाबदारी जेवढी नाट्यगृह व्यवस्थापनांची आहे तितकीच ती महापालिकेच्या अग्निशमन विभागाचीही आहे. तरीही या गोष्टीकडे धक्कादायकरित्या दुर्लक्ष करण्यात आले आहे. पार्किंग आणि व्यवसाय सांगलीच्या भावे नाट्यगृहात सध्या कोणतेही प्रयोग होत नाहीत. तरीही बुधवारी तेथे चारचाकी, दुचाकी वाहनांचे पार्किंग दिसून आले. भावे नाट्यगृहाच्या आवारात नेहमीच असे ‘पे अॅण्ड पार्क’ चालते. याठिकाणच्या परिसरातील काही व्यापारी, नागरिक वाहने नियमितपणे पार्क करण्यासाठी महिन्याकाठी ठेकेदाराला काही पैसे देत असल्याचे समजते. महापालिकेमार्फत नाट्यगृह बांधकामावर भाडेपद्धतीने घरपट्टी आकारली जाते. मात्र मोकळ्या जागेला कर नाही, असे घरपट्टी विभागाने सांगितले. शहरातील अन्य मोकळ्या जागांना घरपट्टी लागू आहे. मोकळ्या जागेला घरपट्टी आकारली जात नसली तरी, तेथे या पार्किंगच्या माध्यमातून व्यावसायिक वापर केला जात आहे.भंगाराची जागामहापालिकेच्या सांगलीतील दीनानाथ नाट्यगृह व मिरजेच्या बालगंधर्व नाट्यगृहात भंगाराचे साहित्य, तसेच मोडकळीस आलेली वाहने ठेवण्यात आल्याचे बुधवारी दिसून आले. मिरजेत बुधवारच्या भाजी बाजारामुळे बालगंधर्व नाट्यगृहात जाण्यासाठीही वाट शिल्लक नव्हती.
फायर आॅडिटबद्दल पालिकाच अनभिज्ञ
By admin | Updated: February 12, 2015 00:30 IST