लोकमत न्यूज नेटवर्क
वांगी : वांगी (ता. कडेगाव) परिसरात आरफळ व ताकारी योजनेच्या पाण्याने सुबता आली असली तरी ऑनलाईन सातबारावरील चुकांमुळे त्यांना खासगी सावकारांचा आसरा घ्यावा लागत आहे. उसाच्या बिलातून कर्ज फेडूनही ऑनलाईन सातबाऱ्यातील चुकांमुळे शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून कर्ज मिळणे अशक्य झाले आहे. यामुळे त्यांच्यावर ही नामुष्की आली आहे.
तालुक्यात सर्वात जास्त सुमारे ३ हजार ६०५ हेक्टर क्षेत्र असणाऱ्या वांगी येथे आरफळ, ताकारी योजनांमुळे मोठ्या प्रमाणात ऊस शेती केली जाते. त्यामुळे येथील आर्थिक व्यवहार हे ऊस शेतीवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यास गेला. त्याचे आलेले पैसे सोसायटी कर्जास जमा झाले; मात्र नवीन कर्जास ऑनलाईन उतारा व ई करार असल्याशिवाय कर्ज देणार नाही. अशी भूमिका जिल्हा बँक व सोसायट्यांनी घेतल्यामुळे शेतकऱ्यांना इतर देणी देण्यासाठी सोने तारण कर्ज किंवा खासगी सावकाराकडून पैसे घ्यावे लागत आहेत.
वांगी येथील अनेक शेतकऱ्यांच्या ऑनलाईन सातबाऱ्यात मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत. सात बाऱ्यावर नाव एकाचे, सर्व्हे नंबर दुसऱ्याचा, सात बाऱ्यावर काही नावे आहेत, तर काही गायब झाली आहेत, चुकीचे क्षेत्र अशा अनेक चुका आहेत. त्यामुळे सोसायट्यांची कर्जे मिळत नाहीत.
चाैकट
चुका दुरुस्तीसाठी हेलपाटे
सात-बारा दुरुस्तीसाठी शेतकरी तलाठी कार्यालयात हेलपाटे घालत आहेत.
वांगी गावाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे शासनाने वांगी भाग १ व वांगी भाग २ असे दोन तलाठी सजा मंजूर केले असताना. गावाला मात्र गेल्या दोन वर्षापासून एकही तलाठी पूर्णवेळ मिळत नाही. यामुळे शेतकऱ्याची ऑनलाईन कामे थांबली आहेत.