जत : तालुक्यातील तिकोंडी व बिळूर परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारे आणि पावसामुळे आडव्याप्पा कलाप्पा अमृतहट्टी (रा. तिकोंडी) व आप्पासाहेब आडव्याप्पा जाबगोंड (रा. बिळूर) यांची तयार झालेली द्राक्षबाग पडून सुमारे वीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तहसीलदार अभिजित पाटील-सावर्डेकर यांनी बिळूर (ता. जत) येथील द्राक्षबागेस भेट देऊन पाहणी केली व तात्काळ पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश मंडल अधिकारी हसन निडोणी यांना दिले आहेत.आडव्याप्पा अमृतहट्टी यांची पाच एकर द्राक्षबाग आहे. यामध्ये सुमारे तीस ते पस्तीस टन द्राक्षे तयार झाली होती. तसेच आप्पासाहेब जाबगोंड यांची साडेतीन एकर द्राक्षबाग आहे. त्यामध्ये सुमारे चाळीस टन द्राक्षे तयार झाली होती. गुरुवारी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे संपूर्ण द्राक्षबाग कोसळून भुईसपाट झाली आहे. यामध्ये सुमारे वीस लाख रुपयांचे नुकसान झाले. अमृतहट्टी व जाबगोंड यांच्याप्रमाणेच तालुक्यात इतर शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचेही नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश माळी यांनी केली. (वार्ताहर)
तिकोंडी, बिळूरमध्ये द्राक्षबागा कोसळल्या
By admin | Updated: April 11, 2015 00:10 IST