लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : तालुक्यातील शिरगावचे पोलीस कर्मचारी अनिल आंबी यांच्या घरी चोरट्यांनी प्रवेश करून सुमारे तीन लाखांचे दागिने व रोख रक्कम शनिवारी मध्यरात्री लंपास केली.
शिरगाव (ता. वाळवा) येथील अनिल आंबी मिरजेला वायरलेस विभागात पोलीस आहेत. शिरगावात मध्यवर्ती ठिकाणी त्यांचे घर आहे. आंबी यांच्या आई आजारी असल्याने मिरजेत उपचार घेत आहेत, तर वडीलही तिथेच आहेत. घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन शनिवारी रात्री दरवाजाचा कडीकोयंडा कटावणीने तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील तिजोरीचे कुलूप तोडून साडेचार तोळे दागिने व रोख २५ हजार रुपये रोकड असा तीन लाखांचा ऐवज लंपास केला. रविवारी सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात चोरीचा प्रकार आला. त्यानंतर अनिल आंबी यांना बोलावून घेण्यात आले. ते आल्यानंतर त्यांनी आष्टा पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली.
आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद, सहायक पोलीस निरीक्षक मनोज सुतार, हवलदार उदय पाटील, संदेश यादव यांनी रविवारी पाहणी करून पंचनामा केला. श्वान आणून माग काढला असता श्वान गावच्या पिण्याच्या टाकीपाशीच घुटमळले. सोमवारी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पाहणी करून तपासकामी मार्गदर्शन केले. पोलिसाच्या घरी मध्यवर्ती ठिकाणी धाडसी चोरी झाल्याने घबराटीचे वातावरण आहे.