लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : कोरोना महामारीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलची जिल्ह्यात यशस्वी वाटचाल सुुरू आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील व डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे आरोग्याभिमुख कार्याद्वारे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. तुषार कणसे यांनी जिल्ह्यात डॉक्टर सेलची पाळेमुळे घट्ट रोवली आहेत.
एकेकाळी महाराष्ट्रात व सांगली जिल्ह्यात भाजपा व युती सरकारची सत्ता असताना राष्ट्रवादी डॉक्टर सेलला पदाधिकारी निवडताना तारेवरची कसरत करावी लागत होती. कार्यकारिणी तयार करण्याचे शिवधनुष्य डॉ. कणसे यांनी लिलया पेलले व सर्व जिल्हा कार्यकारिणी तयार करून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादी डॉक्टर सेल पोहोचवली.
जिल्हाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज पाटील यांनी जिल्ह्याच्या कार्यकारिणीला बांधून ठेवून, प्रत्येक तालुका पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधत, पक्षाच्या विविध योजना उपक्रम राबवले आहेत.
डॉक्टर सेलच्या यशस्वी वाटचालीचे प्रत्यंतर सध्याच्या कोरोना लसीकरणाच्या जनजागृतीमध्ये देखील आले. यामध्ये डॉ. कणसे यांनी वाळवा, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात विविध ठिकाणी कोविड लसीकरण मदत कक्ष सुरू केले, स्वर्खचाने मंडप उभारणी केली, तर इस्लामपूरमध्ये नूतन प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अतुल मोरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे मदत कक्ष सुरू केले व कोविड योध्द्यांचा सन्मानही केला. त्यांच्यासोबत डॉ. अनिल माळी व डॉ. अमित सूर्यवंशी यांचेही मोलाचे योगदान मिळाले. तासगाव तालुक्यात देखील डॉ. प्रशांत किंकर, डॉ. सतीश माळी, कवठेमहांकाळ तालुक्यात डॉ. आर. आर. पाटील, जत तालुक्यात डॉ. पराग पवार, मिरज तालुक्यात डॉ. गणेश पाटील, तसेच जिल्ह्यात डॉ. राजन अडिसरे, डॉ. रूपेश पाटील, डॉ. अमर पाटील, डॉ. दिग्विजय पाटील हे पदाधिकारी प्रामाणिकपणे आपले योगदान देत आहेत. त्यामुळेच जिल्ह्याच्या राजकारणात इतर संघटनांपेक्षा राष्ट्रवादी डॉक्टर सेलची ताकद वाढलेली आहे, अशी माहिती डॉ. तुषार कणसे यांनी दिली.