कडेगाव : अंबक (ता. कडेगाव) येथे गर्दी झाल्याने विद्यार्थ्यांना एसटी बसमध्ये चढू न देणारा चालक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत हमरीतुमरी झाली. एकमेकांना शिवीगाळ झाल्याने प्रकरण चिंचणी (वांगी) पोलिसांत गेले. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांना चोप दिला.अंबक येथील शंभरहून अधिक विद्यार्थी सकाळी कडेपूर, विटा, कऱ्हाड आदी ठिकाणी जातात. सकाळी ७.३० वाजता पलूस आगाराची इस्लामपूर-कडेगाव ही गाडी अंबक येथे आली. यावेळी कडेगावकडे जाणाऱ्या या गाडीमध्ये प्रथम मुली बसल्या. त्यानंतर अनेक मुलेही गाडीत चढून उभा राहिली. गाडी खचाखच भरली तरीही २० ते २५ विद्यार्थी खाली राहिले. हे सर्व विद्यार्थी गाडीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी चालकाने खाली उतरून विद्यार्थ्यांना गाडीमध्ये न घेता दरवाजा बंद केला. यावरून विद्यार्थी आणि चालकात बाचाबाची झाली. याचे पर्यवसान शिवीगाळीत झाले. शेवटी बसचालकाने चिंचणी (वांगी) पोलीस ठाण्यात गाडी नेली. यावेळी संतप्त विद्यार्थीही गाडीच्या मागून दुचाकीवरून पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी विद्यार्थ्यांना चोप दिला. यावेळी माजी सरपंच सुनील जगदाळे यांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटविण्यात आले. (वार्ताहर)
विद्यार्थी-बसचालकात हमरी-तुमरी
By admin | Updated: August 7, 2014 00:23 IST