सावळज : वज्रचौंडे (ता. तासगाव) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विट्यातील पथकाने छापा टाकून बेकायदा विदेशी दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली आहे. ते गोव्यातून दारूची तस्करी करून विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून एक दुचाकी व दोन मोटारी जप्त केल्या आहेत. ही कारवाई आज सोमवारी करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये संभाजी शिवाजी जाधव (वय २६, रा. वज्रचौंडे), प्रवीण पुंडलिक पाटील (२३) व कृष्णा बाबूराव सदामते (२५, कुची), विशाल बबन बाबर (२२, रा. कुची), गणेश मारूती चव्हाण (२०, वासुंबे) यांचा समावेश आहे. हे सर्व गेल्या अनेक दिवसांपासून गोव्यातून विदेशी दारूची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली होती. विटा विभागाचे प्रभारी निरीक्षक मनोज संबोधी, स्वप्नील कांबळे, उमेश निकम, सुनील लोहार, संतोष बिराजदार, सचिन सांगोळे यांचे पथक त्यांच्या मागावर होते. वज्रचौंडे ते मणेराजुरी या मार्गावरून ते दारूची वाहतूक करणार असल्याचे समजताच पथकाने आज (सोमवार) सापळा रचून त्यांना पकडले. त्यांनी दुचाकीवरून (क्र. एमएच. १०. बीएच. १३१२) दारूचे पाच बॉक्स आणले होते. हे बॉक्स मोटारीत (क्र. एमएच.१० बी. १४७५) भरत असताना पकडण्यात आले. सदामते घरी दारूचा साठा करीत होता. (वार्ताहर)
वज्रचौंडे येथे दारू जप्त राज्य उत्पादन शुल्कची कारवाई :
By admin | Updated: August 25, 2014 22:09 IST