वांगी : ताकारी योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करा, अन्यथा ताकारी योजनेच्या देवराष्ट्रे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन शेतकरी संघटनेने ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.
कडेगाव, खानापूर व तासगाव तालुक्यांत पाऊस अत्यंत कमी प्रमाणात झाल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी फार खोल गेली आहे. योजनेमुळे लाभक्षेत्र जादा असल्यामुळे व विहिरीत पाणी नसल्यामुळे पिके वाळू लागली आहेत. कोरोनाने अडचणीत आलेला शेतकरी शेतीला पाणी नसल्यामुळे फारच अडचणीत आला आहे. तरी ताकारी योजनेचे आवर्तन १ ऑक्टोबरला चालू करावे अन्यथा शेतकरी संघटनेच्यावतीने देवराष्ट्रे येथील ताकारी योजनेच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असे निवेदन देवराष्ट्रे विभागातील कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष परशुराम माळी, भाऊसाहेब पवार, अर्जुन कदम, अधिकराव पवार, प्रशांत माळी, उल्हास शिदे, विजय वाघ, विजय माळी यांच्या स्वाक्षरी आहेत.