अशोक पाटील - इस्लामपूर - इस्लामपूर शहरातील मुख्य रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. यावर एम. डी. पवार यांचे नातू वैभव पवार, विजय पवार यांच्यासह विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. विरोधकांचे आव्हान सत्ताधाऱ्यांतील ज्येष्ठ नगरसेवक आनंदराव मलगुंडे यांनी स्वत:च्या प्रभागात अंगावर घेतले आहे, परंतु पालिकेत गेली पंचवीस वर्षे कारभारी असलेले विजयभाऊ पाटील यांनी मात्र या विषयावर मौन पाळले आहे.शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे. हे रस्ते पालिका आणि ठेकेदार यांच्यामध्ये झालेल्या कराराप्रमाणे होत नसल्याचा आरोप करून माजी नगरसेवक वैभव पवार आणि त्यांचे बंधू विजय पवार यांनी रस्त्याची कामे बंद पाडली आहेत. यावर इस्लामपूरची आणि पालिकेच्या कारभाराची जबाबदारी असणाऱ्या विजयभाऊंनी मात्र मौन पाळले आहे. पालिकेतील टाचणी खरेदीपासून कोट्यवधी रुपयांच्या ठेक्याचा निर्णय विजयभाऊंशिवाय होत नाही. त्यामुळे शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे होण्याची जबाबदारीही त्यांचीच असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या बैठकीत त्यांनी स्वत:चेच समर्थक नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी आणि प्रशासनाकडे बोट दाखवून जबाबदारी झटकली आहे.सध्या पालिकेतील नेतेमंडळी एकमेकांच्या सोयीचे राजकारण करत आहेत. ‘स्वार्थ हाच परमार्थ’ असे मानून काही नगरसेवकांनी स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ते विरोधकांना अंगावर घेऊन स्वत:च्या पायावर दगड मारुन घेण्यासाठी तयार नाहीत. तीच भूमिका विजयभाऊंनीही घेतल्याचे दिसते.विरोधी पक्षनेते विजय कुंभार, कपिल ओसवाल आणि आनंदराव पवार असे तीनच नगरसेवक विरोधात आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. त्यामुळे सभागृहात विरोधकांची बाजू लंगडी पडते. सत्ताधारी सोयीप्रमाणे ठराव मंजूर करुन घेतात. यावर उपाय म्हणून पवार बंधू यांनी थेट रस्त्यावर उतरून, अशा बेकायदेशीर कामांना विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या भूमिकेने नवसंजीवनी मिळाली असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी निकृष्ट रस्तेकामाबाबत मौन का पाळले आहे, याचे उत्तर मात्र अनुत्तरीतच राहते.विरोधकांची भूमिका योग्य की अयोग्य, यावर बोलणार नाही. अंतिमक्षणी यावर निर्णय घेणार आहे. माझ्या प्रभागात चांगल्या दर्जाचे रस्ते झाले आहेत. इतर प्रभागातील रस्ते संबंधित नगरसेवक जातीने लक्ष घालून करून घेतील.- विजयभाऊ पाटील, पक्षप्रतोद, इस्लामपूर नगरपालिकानशहरातील रस्ते निकृष्ट दर्जाचे होत आहेत. यामध्ये भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे. गैरव्यवहाराला आळा बसण्यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. सत्ताधाऱ्यांसह विरोधी नगरसेवक आणि जनतेची साथ आहे. निकृष्ट कामाबद्दल नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनीच खुलासा करावा.- वैभव पवार, माजी नगरसेवक
इस्लामपुरातील निकृष्ट रस्तेप्रश्नी विजयभाऊंचे मौन
By admin | Updated: April 10, 2015 23:50 IST