सांगली : गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये डॉल्बी, स्पिकरद्वारे ध्वनीमर्यादेचा भंग केल्याप्रकरणी सात डॉल्बीचालक व गणेशोत्सव मंडळांवर शहर पोलिसांनी कारवाई केली. सातही मंडळांच्या मिरवणुकीतील डॉल्बी व त्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी डॉल्बीचालकासह मंडळाचे अध्यक्ष, सचिवांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी मिरवणुकीत डॉल्बीचा वापर करू नये अन्यथा ते जप्त करण्यात येईल, असा इशारा दिला होता. याबाबत मंडळांनाही सूचना करण्यात आल्या होत्या. मंगळवारी रात्री पाचव्यादिवशी गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी लकीस्टार कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ वखार भाग, गणेशकृपा गणेशोत्सव मंडळ, पेठभाग, सेवन लकी कला मंडळ, बीएसएनएल कार्यालयाजवळ, सांगली, लालबाग श्री कला, क्रीडा मंडळ, जवाहर चौक, सांगली, श्री गणेश क्रीडा मंडळ, वडर गल्ली यांच्यासह सात मंडळांनी ध्वनीमर्यादेचा भंग केला. याची तपासणी केल्यानंतर या मंडळांचे अध्यक्ष अनुक्रमे धनेश भगवान शेटे (रा. वखारभाग), निवृती शंकर कोळेकर (रा. जामवाडी), नितीन शिवाजी सरगर (रा. दत्तनगर, विश्रामबाग), प्रताप शहाजी पाटील (रा. जवाहर चौक, सांगली) विकी मल्हारी मुळके (वडर कॉलनी) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या तपासणीनंतर डॉल्बीचालक निलेश जाधव (रा. शंभर फुटी रोड, सांगली), शरद शहा, सोमनाथ दत्तात्रय भोसले, रमेश पांडुरंग मोहिते, राजू मारुती पोवार यांचे डॉल्बीचे साहित्य, स्पिकर सेट जप्त करण्यात आले. याबाबत आता पंचनामे करून संबंधितांवर न्यायालयात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू मोरे यांनी दिली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पाटील, ध्वनी मोजमाप यंत्रचालक आदींनी सहभाग घेतला. पोलिसांच्या कारवाईमुळे गणेश मंडळांनी धास्ती घेतली असून, अनेकांनी डॉल्बी रद्द केल्याचेही समजते. (प्रतिनिधी)
सात मंडळांचे डॉल्बी साहित्य जप्त
By admin | Updated: September 3, 2014 23:59 IST