लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या काळात गेल्या वर्षभरापासून वारंवार शहरातील व्यवहार अनलाॅक करण्यात आले. या लाॅकडाऊनमुळे शहरातील हवेच्या प्रदूषणात मोठी घट झाली आहे. पहिल्या लाॅकडाऊनपेक्षा दुसऱ्या लाॅकडाऊनमध्ये प्रदूषणाची पातळी थोडीशी वाढली असली, तरी मर्यादा ओलांडली नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शहरातील तीन ठिकाणी हवेच्या गुणवत्तेच्या चाचण्या घेतल्या जातात. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले राजवाडा चौक, विश्रामबाग आणि कुपवाड एमआयडीसी या ठिकाणी चाचण्यासाठी यंत्रणा उभारली आहे. आठवड्यातून दोनदा चाचण्यांचे निष्कर्ष समोर येतात. हवेतील प्रदूषण मोजण्यासाठी सल्फर डाय ऑक्साइड (एसओ२), नायट्रोजन डायऑक्साइड (एन ओ २), धुळीचे कण तपासले जातात. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २३ मार्च, २०२० पासून देशात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. तत्पूर्वी जानेवारी व फेब्रुवारीतील हवेच्या प्रदूषणाची आकडेवारी पाहता एसओटूचे प्रमाण १५ ते १७ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर इतके होते. एनओटूचे प्रमाण ६० ते ८१ व धुळीच्या कणांचे प्रमाण १५० च्या पुढे होते.
एप्रिल, २०२० पासून कडक लाॅकडाऊनमुळे हवेच्या प्रदूषणाची पातळी झपाट्याने घटली. एसओटू ५, एनओटू २५ पर्यंत पोहोचले. धुळीकणांतही बरीच घट झाली होती. त्यानंतर, वर्षभर हवेच्या प्रदूषण पातळी कमी-जास्त होत राहील, पण प्रदूषणाने मर्यादा ओलांडली नसल्याचे समाधान आहे. यंदा जानेवारी, फेब्रुवारीत प्रदूषण पातळीत किंचित वाढ झाली. एप्रिलपासून पुन्हा लाॅकडाऊन लागू झाला. या दरम्यान चारही घटक उत्कृष्ट श्रेणीत आले. थोडी-फार प्रदूषणाची वाढ कायम असली, तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषाप्रमाणे ही वाढ आटोक्यात राहिली. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून सांगलीकरांना शुद्ध हवा मिळत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
चौकट
पर्यावरणाला फायदा
शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग असलेला राजवाडा परिसर, महापालिका, मेनरोड आणि कुपवाड औद्योगिक वसाहतीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांकही (एक्युआय) समाधानकारक राहिला आहे. पहिल्या लाॅकडाऊनमध्ये राजवाडा परिसराचा निर्देशांक ११५ ते १२८ पर्यंत खालावला होता. दुसऱ्या लाॅकडाऊनमध्ये तितके कडक निर्बंध नव्हते. अत्यावश्यक सेवा, उद्योगधंदे, वाहतूक सुरू होती. त्यामुळे हा निर्देशांक २१४ ते २६० पर्यंत पोहोचला होता. निर्देशांकात वाढ झाली असली, तरी ती धोकादायक नव्हती.
चौकट
दोन लाॅकडाऊनमधील हवेची गुणवत्ता (राजवाडा चौक)
कालावधी सल्फर डाय ऑक्साइड नायट्रोजन ऑक्साइड धुळीकण एक्यूआय
जानेवारी २०२० १५ ८१ १४७ ३३०
जानेवारी २०२१ ११ ८१ १४७ ३३०
फेब्रुवारी २०२० ११ ६४ १४२ ३२५
फेब्रुवारी २०२१ ११ ७१ १२६ २७८
मार्च २०२० १० ५४ ८७ २४९
मार्च २०२१ १० ४६ ११६ २६६
एप्रिल २०२० ६ २५ ६४ १७१
एप्रिल २०२१ १० ४२ ७७ १६७
मे २०२० ७ ३४ ४५ १२८
मे २०२१ १० ४२ ७७ १६७