सांगली-कोल्हापूर रस्त्यावर अंकली येथे पोलिसांनी वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करूनच त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला.
छाया : सुरेंद्र दुपटे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : रविवारची संधी साधून पाय मोकळे करायला बाहेर पडलेल्या नागरिकांची पोलिसांनी नाकेबंदी केली. सर्वत्र कडक तपासणी करत, विनाकारण फिरणाऱ्यांची झाडाझडती घेतली. काही वाहनेही ताब्यात घेतली.
रविवारी पोलीस बंदोबस्त कमी असल्याच्या अंदाजाने सकाळी-सकाळी काही लोक बाहेर पडले होते. पण सकाळपासूनच सज्ज असणाऱ्या पोलिसांनी त्यांची परतपाठवणी केली. विश्रामबाग, पुष्पराज चौक, स्टेशन चौक, मिरज रस्त्यावर हनुमान मंदिर येथे सकाळपासूनच पोलीस तैनात होते. विश्रामबागमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी सुरू होती. कागदपत्रे दाखविल्याविना सुटका नव्हती. परराज्यातून येणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी सुरू होती.
कोल्हापूर रस्त्यावर अंकली येथेही कडक बंदोबस्त होता. ई-पासशिवाय पोलिसांनी प्रवेश दिला नाही. शहरात पोलिसांनी काही वाहनेदेखील ताब्यात घेतली. कुपवाड, संजयनगर, पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही पोलीस रस्त्यावर होते. माधवनगर जकात नाक्याजवळ बंदोबस्त होता.