सांगली : जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठी असलेली ९३ गावे पूरबाधित असून या ठिकाणी १ जूनपासून २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येत आहे. यासाठी पूरबाधित गावांचा आपत्ती व्यवस्थापनाबाबत आराखडा तयार करून तो २५ मेपूर्वी जिल्हा प्रशासनास सादर करावा. या कामात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हयगय केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी शुक्रवारी दिला.यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. गायकवाड म्हणाले, मिरज तालुक्यातील २१, पलूस तालुक्यातील २६ ,वाळवा तालुक्यातील ३७ आणि शिराळा तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. भविष्यात पूरपरिस्थिती उद्भवली, तर जनतेला वास्तव माहिती मिळणे आवश्यक आहे. याकरिता पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी धरणातील पाणीसाठा, नदीतील पाण्याची पातळी याची ताजी माहिती प्रसारमाध्यमांद्वारे जाहीर करावी. आपत्ती निवारणाचे साहित्य सज्ज ठेवावे. पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी आलमट्टी धरणातून पाण्याचा योग्य विसर्ग होण्यासाठी कर्नाटक राज्यातील पाटबंधारे विभागाशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती यावेळी पाटबंधारे मंडळाचे उपकार्यकारी अभियंता आर. एल. कोळी यांनी दिली.बैठकीस आ. अनिल बाबर, आ. विलासराव जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पूरबाधित गावांचा २५ मेपर्यंत अहवाल द्या
By admin | Updated: May 16, 2015 00:03 IST