पारे : शासनाच्या सर्व शिक्षा अभियानातून संगणक खरेदी होत असला तरी, त्याला ग्रामीण भागातील पालकांच्या मदतीचा आधार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या प्राथमिक शाळांत लाखो रुपये खर्चून संगणकाचे सेट आणण्यात आले आहेत. परंतु, या किमती संगणकांवर चोरट्यांनी डोळा ठेवून संगणक रातोरात लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक शाळांना सुरक्षा रक्षकच काय, पण साधा शिपाईही नसल्याने प्राथमिक शाळांची सुरक्षा आता रामभरोसे झाली आहे.विटा शहरासह खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात १०५ प्राथमिक शाळा आहेत. प्राथमिक शिक्षण प्रणालीत बदल घडले आहेत. चार भिंतींच्या आत विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देणे आता बाजूला जाऊ लागले असून, त्याची जागा संगणकाने घेतली आहे. त्यामुळे तालुक्यातील जवळपास ४० हून अधिक प्राथमिक शाळांत डिजिटल प्रोजेक्ट आहेत. हे प्रोजेक्ट लोकवर्गणीतून उभे राहिले आहेत. त्यामुळे प्राथमिक शाळांतील चिमुरड्यांची बोटे की-बोर्डवर फिरू लागली आहेत. खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रत्येक शाळांत कमीत कमी सहा ते सात संगणक सेट आहेत. बऱ्याच प्राथमिक शाळांच्या इमारती जुन्या व मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे दरवाजे, कौले व अन्य बांधकाम कमजोर झाले आहे. त्याचा गैरफायदा चोरटे घेऊ लागले आहेत. लोकवस्तीपासून थोड्या दूर असलेल्या शाळांची कुलपे व दरवाजे तोडून अज्ञात चोरटे संगणक, होम थिएटर्स, माध्यान्ह भोजनाची भांडी, तेल, तांदूळ यासह अन्य साहित्य हातोहात लंपास करीत आहेत. त्यामुळे शिक्षकांसह पालकांतही चिंतेचे वातावरण पसरले आहे.तालुक्यातील प्राथमिक शाळांत सत्र दोनची तयारी सुरू आहे. परीक्षा संपल्यानंतर दीड महिन्याची उन्हाळी सुट्टी असल्याने त्या कालावधित शाळा बंद राहतात. त्यामुळे किमती संगणक व अन्य साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत शिक्षकांतूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळांतील संगणक व अन्य साहित्याची सुरक्षा आता प्रशासनाच्या जाचक नियमांमुळे रामभरोसे झाली आहे. प्राथमिक शाळांतील किमती संगणकांसह अन्य साहित्याची चोरी रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत पालकांतून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)किमती संगणक व अन्य साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत शिक्षकांतूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळांतील संगणक व अन्य साहित्याची सुरक्षा आता प्रशासनाच्या जाचक नियमांमुळे रामभरोसे झाली आहे.शाळांची कुलपे व दरवाजे तोडून संगणक पळविले जात असल्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या साहित्याच्या सुरक्षेबाबत प्रशासनानेच ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.
प्राथमिक शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
By admin | Updated: April 10, 2015 00:23 IST