कृष्णेचे उगमस्थान जरी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर असले तरी, या नदीने सांगली जिल्ह्याला समृद्धीचे वरदान दिले. देशातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेल्या कृष्णेची कृपादृष्टी सांगलीला लाभली. सांगलीतील तिची लांबी १३० किलोमीटर इतकी आहे. जिल्ह्यातील नदीची रुंदी कृष्णेचा उगम सह्याद्रीच्या रांगेतील धोम महाबळेश्वराच्या १ हजार ४३८ मीटर उंचीच्या डोंगरात १ हजार २०० मीटर उंचीवर होतो. सांगली जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला ती पश्चिमेकडून पूर्वेकडे, नंतर दक्षिण-पूर्व दिशेकडे वाहते. या सर्व भागाला सधनतेचे वरदान कृष्णा नदीमुळे लाभले आहे. मिरज तालुक्यातील हरिपूर येथे कृष्णेचा वारणेशी संगमही होतो. पश्चिमेकडून वारणा व पूर्वेकडून येरळा या नद्या कृष्णा नदीला मिळतात.
कृष्णेच्या खोऱ्यात जांभूळ, हिरडा, नागचाफा, सुरंगी, फणस, तमालपत्र, अंजनी, शिसव, सावर, किंजळ, असाणी, कुंभी, कव्हा, चिंच, कवठ, बोर, बेल, बाभूळ, साग, धामण, शिवण, धावडा, ऐन, किनई, खैर आदी झाडे आढळतात. तसेच कुडा, वाकेरी, भारंग, वावडिंग, सातवी, घायटी, बेडकी, बिब्बा, बाव्हा, भुईकोहळा आदी औषधी वनस्पतीही सापडतात.
कृष्णा नदीवर सांगली जिल्ह्यात ताकारी, म्हैसाळ यासारख्या उपसा सिंचन योजना राबवून त्यांचा लाभ दुष्काळी तालुक्यांना दिला जात आहे. त्यामुळे ही नदी जिल्ह्याच्या प्रत्येक भागासाठी आता समृद्धीचा बहर देऊ पाहत आहे. कृष्णा नदीची महती व सांगली जिल्ह्यातील तिच्या अनेक घटनांची नोंद जिल्ह्यात सापडलेल्या ताम्रपट, शिलालेखांवर आढळतो. कृष्णा नदीने जसे समृद्धीचे वरदान दिले, तसे महापुराच्या माध्यमातून प्रलयसुद्धा आणला. तरीही जिल्ह्याची ती जीवनदायिनी असल्याने प्रलयानंतरही कृष्णाकाठचे या नदीवरील प्रेम कधीच कमी झाले नाही. कारण जेवढे नुकसान या प्रलयात झाले, त्यापेक्षा कित्येक पटीने या कृष्णामाईने जिल्ह्याला सधनताही दिली.