मालगाव : बदलत्या वातावरणामुळे द्राक्षशेतीचे नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे चित्र असताना, मालगाव येथील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अशोक माळी यांनी अवघ्या वीस गुंठे जमिनीत माणिक चमन जातीच्या ५ हजार पेटी द्राक्षाचे उत्पादन घेऊन आतापर्यंतच्या द्राक्ष उत्पादनाचा विक्रम मागे टाकला आहे. डॉ. माळी यांच्या द्राक्ष उत्पादनाच्या विक्रमाची कृषी विभागाने दखल घेतली आहे. अधिकाऱ्यांनी या बागेला भेट देऊन पाहणी केली.मिरज पूर्व भागातील खंडेराजुरी-कुकटोळी रस्त्यालगत असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी डॉ. अशोक माळी यांची शेतजमीन आहे. या भागात पाण्याचे स्रोत कमी असताना त्यांनी वातावरणाचा अभ्यास करुन २० गुंठे जमिनीत माणिक चमन जातीच्या द्राक्ष झाडांची लागण केली. रासायनिक खतांचा अल्प प्रमाणात मात्र जादा सेंद्रीय खतांचा वापर करीत माळरानावर बाग फुलविली. माणिक चमन जातीच्या या बागेतून त्यांनी विक्रमी द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी २० गुंठ्यातील ५०० झाडांना प्रत्येकी २५ काड्या व प्रत्येक काडीस दोनच घड ठेवले. या बागेतील उतरणीस आलेल्या प्रत्येक घडाचे शंभर दिवसात एक किलो वजन आहे. २० गुंठ्यात ५ हजार पेटी द्राक्ष उत्पादन घेणारच, असा त्यांचा विश्वास आहे. द्राक्ष उत्पादनातील आतापर्यंतचा एकरी सात हजारपर्यंत द्राक्षपेटीचा विक्रम आहे. वीस गुंठ्यात पाच हजार पेटी द्राक्ष उत्पादन घेऊन द्राक्ष उत्पादनातील आतापर्यंतचा विक्रम त्यांनी मागे टाकला आहे. डॉ. माळी यांनी घेतलेल्या या विक्रमी द्राक्ष उत्पादनाची तालुका कृषी विभागाने दखल घेतली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, तालुका कृषी अधिकारी एच. एस. मेढीदार व कृषी सहायक व्ही. एस. सूर्यवंशी यांनी द्राक्षबागेला भेट देऊन पाहणी केली.त्यांनी या नव्या विक्रमाची माहिती घेतली. परिसरातील द्राक्ष बागायतदारही या बागेला भेट देऊन, माळी यांच्याकडून खतांचा वापर व इतर उपाययोजनांची माहिती घेत आहेत. डॉ. माळी यांनी द्राक्षाबरोबरच कमी पाण्यात व सेंद्रीय खतांवर आंबा तसेच केळीचेही विक्रमी उत्पादन घेतले आहे. (वार्ताहर)द्राक्षबागेसाठी नियोजन महत्त्वाचे : माळी द्राक्षबागेत रासायनिक खतांचा जादा वापर टाळून सेंद्रीय खतांवर भर द्यावा. बागेतील पानांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी पाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवण्याबरोबरच औषधांच्या अधिक प्रमाणात फवारण्या न घेता आवश्यकतेनुसार कराव्यात. द्राक्षझाडाच्या मुळाशी तुटलेली पाने तसेच केळीची तुटलेली खुटे टाकून पाण्याचे होणारे बाष्पीभवन कमी करता येते. त्यामुळे कमी पाण्यात द्राक्षाचे विक्रमी उत्पादन घेता येते. बदलत्या वातावरणाचा अभ्यास करुन तातडीने उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. सेंद्रीय खते द्राक्षशेतीला अधिक उपयुक्त असल्याचे डॉ. अशोक माळी यांनी सांगितले.
खंडेराजुरीत २० गुंठ्यात ५ हजार द्राक्षपेट्यांचे उत्पादन
By admin | Updated: January 30, 2015 23:17 IST