कुपवाड : कुपवाड एमआयडीसीमधील कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्सकडून उद्योजकांच्या समस्यांना तिलांजली दिली जात आहे़ माथाडी कामगार व खराब रस्त्यांप्रकरणी उद्योजकांसाठी आंदोलन केले़ त्यांच्या मनमानीला विरोध केल्यामुळेच नव्या उपाध्यक्ष-सचिवांची निवड करण्यात आली़ ही निवड चुकीची व घटनाबाह्य आहे़ आम्हीच त्या पदावर कायम आहोत़ नव्या निवडीबद्दल धर्मादाय आयुक्तांकडे कॅव्हेट दाखल केले असल्याची माहिती उपाध्यक्ष डी़ के. चौगुले, सचिव जफर खान व संचालक मनोज भोसले यांनी दिली़ यावेळी चौगुले, खान व भोसले म्हणाले की, कृष्णा व्हॅली चेंबरची रविवारी २८ डिसेंबर रोजी घेण्यात आलेली मासिक सभा पूर्णत: बेकायदेशीर व घटनाबाह्य आहे़ नव्या निवडी या स्वयंघोषित व तथाकथित आहेत़ आम्हीच त्या पदावर कायम आहोत़ कृष्णा व्हॅली चेंबरच्या इतिहासात प्रथमच जिरवाजिरवी, कट-कारस्थान आणि द्वेषाचे राजकारण केले जात आहे़ पदे भूषविण्याकरिता उद्योजकांच्या समस्यांना तिलांजली दिली जात आहे़ या निवडीविरोधात कॅव्हेट दाखल असतानाही नव्या निवडी करून न्यायालयाचा अवमान केला गेला आहे़ प्रारंभी सचिव खान यांनी सभेची नोटीस काढली होती़ अध्यक्ष पाटील यांनी ती नोटीस धुडकावून लावली़ त्यानंतर २० रोजी नव्याने सभेची नोटीस काढली़ सचिव कार्यरत असताना संस्थेच्या इतिहासात ही घटना प्रथमच घडली़ त्यातून अध्यक्षांची मनमानी दिसून येते़ तज्ज्ञ संचालक निवडीविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार असूनही त्यातील संचालकाची पदाधिकारी म्हणून बेकायदेशीर निवड केली आहे़ हे चुकीचे आहे़ चेंबरमधील अपप्रवृत्तीविरोधात सभासदांमध्ये जनजागृती करणार असल्याची माहितीही चौगुले, खान व भोसले यांनी दिली़ दोन्ही गटांनी परस्परविरोधात तक्रारी केल्यामुळे आता कृष्णा व्हॅली चेंबरमधील संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. (वार्ताहर)उद्योजकांनी उठाव करण्याची गरजउद्योजकांनी आता चेंबरप्रकरणी उठाव करण्याची गरज आहे़ दुर्लक्ष केल्यास चेंबरची ग्रामपंचायत झाल्याशिवाय राहणार नाही़ पाच वर्षात जे प्रश्न सुटले नाहीत़, ते आता दोन महिन्यासाठी निवडी करून सुटणार आहेत काय?, असा सवालही चौगुले, खान व भोसले यांनी केला आहे़
उद्योजकांच्या समस्यांना तिलांजली
By admin | Updated: December 29, 2014 23:37 IST