शीतल पाटील -सांगली महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीवरून सर्वच पक्षांत कुरघोडीने डोके वर काढले असून, पुन्हा एकदा सत्तेचा बाजार मांडला जात आहे. पदाच्या लालसेतून पक्षाच्या नेत्याचाच आदेश धाब्यावर बसविण्याची जुनीच परंपरा काँग्रेसच्या काळात कायम आहे. अडीच वर्षापूर्वी या राजकीय खेळात माजी मंत्री जयंत पाटील ‘टार्गेट’ होते, आता मदन पाटील आहेत, हाच काय तो फरक! या खेळात केवळ खांदा बदलला असून, आता आ. पतंगराव कदम यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वकियांना घायाळ करण्याची व्यूहरचना आखली जात आहे. गेल्या चार वर्षात महापालिकेच्या राजकारणात कृष्णेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पूर्वी नेत्यावर निष्ठा व्यक्त करणारे नगरसेवक आता पदासाठी कोणत्याही स्तराला जाऊ लागले आहेत. अडीच वर्षापूर्वी असाच एक अध्याय पालिकेच्या इतिहासात लिहिला गेला. माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी पदाचा राजीनामा देण्यास नकार देत नेत्यांनाच झिडकारले. परिणामी माजी मंत्री जयंत पाटील यांची राज्यभर बदनामी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही जयंतरावांना सहकाऱ्यांचे टोमणे ऐकून घ्यावे लागले होते, असे त्यांचे समर्थक सांगतात. पालिकेतील राजकीय खेळखंडोबाला वैतागलेल्या सांगली, मिरज आणि कुपवाडच्या जनतेने मदन पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले होते. किमान पुढील काळात तरी सत्तेचा बाजार होणार नाही, अशी जनतेची अपेक्षा होती. पण आता ती फोल ठरते की काय, अशी स्थिती पालिकेत निर्माण झाली आहे. त्याचा प्रयत्न महापौर, उपमहापौर निवडीच्या निमित्ताने समोर आला आहे. सत्ताधारी गटात कधी नव्हे इतकी उपमहापौर पदासाठी चुरस निर्माण झाली आहे. मदन पाटील यांनी उपमहापौर पदासाठी प्रशांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर सांगलीवाडीच्या नगरसेविका वंदना कदम यांनीही अर्ज दाखल करून रंग भरला आहे. त्यांच्या अर्जावर नायकवडी समर्थक अश्विनी कांबळे व अतहर नायकवडी यांच्या सह्या आहेत. याचा अर्थ नेमका काय घ्यायचा?, असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडला आहे. विकास महाआघाडीच्या काळात नायकवडींनी जयंतरावांना चांगलेत झुंजविले होते. तेव्हा काँग्रेसच्या खांद्यावर त्यांनी बंदूक ठेवली होती. आता केवळ खांदा बदलला आहे. निशाण्यावर जयंतरावांच्या जागी मदन पाटील, तर बंदूक पतंगराव कदम यांच्या खांद्यावर आहे.नायकवडी गटाच्या खेळीने काँग्रेस घायाळ झाली आहे. यंदाच्या निवडीत त्यांच्या खेळीचा कितपत परिणाम होईल, याविषयी साशंकता असली तरी, वर्षभरानंतर होणाऱ्या महापौर व उपमहापौर निवडीवेळी मात्र दगाफटक्याची चर्चा रंगली आहे. वर्षभरानंतर महापौरपद सर्वसाधारण गटासाठी खुले असून, तेव्हाच सत्तेचा बाजार आणखी गरम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. समीकरणे विस्कटलीपालिकेत काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादीचे २५, स्वाभिमानीचे ११ सदस्य आहेत. काँग्रेसमधील एखादा गट फुटला, तर, संपूर्ण समीकरणेच विस्कटणार आहेत; पण केवळ कॉँग्रेसलाच फुटीचे ग्रहण लागलेले नाही. राष्ट्रवादी, स्वाभिमानीतही धुसफूस आहे. त्याचा लाभ उठविण्यात काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार माहीर आहेत. स्वाभिमानीत भाजप, शिवसेना, जनता दल, मनसे यांचा समावेश आहे. या चारही पक्षात एकवाक्यता नाही. त्यामुळे त्यातील कोणताही गट सत्ताधाऱ्यांना मदत करू शकतो. राष्ट्रवादीतही मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. केवळ मोजक्याच नगरसेवकांची कामे मार्गी लागत आहेत. उर्वरित सदस्यांना सत्ताधाऱ्यांची मनधरणी करावी लागते. परिणामी राष्ट्रवादीतही सारे आलबेल राहिलेले नाही. भविष्यात सत्तेची भेळमिसळ झाल्यास नवल वाटू नये.
महापालिकेत पुन्हा सुरू झाला सत्तेचा बाजार...
By admin | Updated: January 29, 2015 00:07 IST