सांगली : कमरेला गावठी पिस्तूल लावून खुलेआम फिरणाऱ्या दिलीप ऊर्फ विलास शांताराम जाधव (वय ३२, रा. रामोशी गल्ली, उरुण इस्लामपूर) यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज (गुरुवार) दुपारी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत पन्नास हजार रुपये आहे. त्याची कसून चौकशी सुरु असून, आणखी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली आहे.जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत व अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांनी गणेशोत्सव व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जबरी चोरी, घरफोडी व बेकायदा हत्यार बाळगणाऱ्या संशयितांची नावे निष्पन्न करुन त्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक फौजदार राजू कदम, हेड कॉन्स्टेबल सुहास गंगधर, अशोक जाधव, विजय कोळी, संदीप मोरे, कुलदीप कांबळे, चालक कोळेकर यांचे पथक गुरुवारी इस्लामपुरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना इस्लामपुरातील आष्टा नाका येथील धोंडीराज बुवा मठासमोर दिलीप जाधव कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने जाधवला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, एक लोखंडी पिस्तूल मिळाले. ते जप्त करण्यात आले. त्याची किंमत पन्नास हजार रुपये आहे. बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी जाधवविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तपास गुन्हे अन्वेषणचे पथक करणार आहे. तो शेळीपालनाचा व्यवसाय करतो. पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आला आहे. त्याला उद्या (शुक्रवार) दुपारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. दरम्यान, जाधवच्या नातेवाईक व मित्रांनी गुन्हे अन्वेषणच्या कार्यालयासमोर सायंकाळी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)अटकेत असलेल्या जाधवची कसून चौकशी सुरु आहे. यातून आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांनाही ताब्यात घेण्यात येणार आहे. यासंदर्भात निरीक्षक घनवट म्हणाले की, जाधवने हे पिस्तूल कोठून व कधी आणले होते, तो ते कशासाठी बाळगत होता, याचा उलगडा केला जाईल. यामध्ये संशयितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
इस्लामपुरात पिस्तूल जप्त एकास अटक : आणखी दोघांची नावे निष्पन्न
By admin | Updated: September 5, 2014 00:08 IST