सांगली : ‘ज्ञानपीठ’ पारितोषिक विजेते आणि आपल्या कवितांतून मराठीजनांवर भुरळ घालणारे ख्यातनाम कवी विंदा करंदीकर यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व शुक्रवारी त्यांच्या कन्या जयश्री काळे यांनी उलगडले. कवितेमागचा हेतू आणि त्याच्या वेदना मांडत करंदीकरांची समाजाकडे बघण्याची सकारात्मक मानसिकता मांडण्यातही त्या यशस्वी झाल्या. यावेळी विश्वास काळे यांनी लघुपटाच्या माध्यमातून ‘विंदां’च्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाशझोत टाकला. महात्मा गांधी ग्रंथालय व रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘विंदा माझ्या नजरेतून’ या कार्यक्रमातून जयश्री काळे यांनी ‘भाऊंच्या’ आठवणी जागविल्या. सुरुवातीला त्यांनी सांगितले की, ‘विंदा’ अर्थात भाऊंचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व जाणून घेत त्यांच्या विचारांकडे आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजावून घेणे हा काव्यवाचनाचा हेतू आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी विंदा करंदीकर यांच्या बालकवितांचे जग उलगडून दाखविले. मुलांच्या भावविश्वावर समरूप होणाऱ्या कविता ज्या मोठ्यांनाही लुभावतात, अशा कवितांतून कल्पना व वास्तव यांची सांगड घालण्यात भाऊ यशस्वी झाल्याचे सांगत, विश्वास काळे यांनी ‘स्वप्नात पाहिली राणीची बाग’ ही कविता यावेळी सादर केली. प्रेमात थांबायला तयारी नसते आणि नकार तर नकोच असतो, अशा भावनिक वातावरणावर बेतलेली ‘लागेल जन्मा पुन्हा’ ही प्रेमकविता जयश्रीतार्इंनी सादर केली. यावेळी डॉ. दिलीप पटवर्धन, दिलीप नेर्लीकर, अशोक मेहता, पुरुषोत्तम मालपाणी, लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर, डॉ. अनिल मडके, प्राचार्य आर. जी. कुलकर्णी, महेश कराडकर आदींसह रसिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘विंदां’च्या जीवनावरील लघुपटाचे सादरीकरणयावेळी ‘प्रेम करावे असे’, ‘घेऊन जा सर्व माझे’, ‘फितूर झाले तुजला अंबर’, ‘कर कर करा...मर मर मरा...’, ‘तेच ते’ आदी कविता सादर केल्या. विंदा करंदीकर यांच्या जीवनावरील लघुपटही यावेळी सादर करण्यात आला. मान्यवरांनी विंदांच्या कवितांचे भावविश्व उलगडताना अनेक कविता सादर केल्या. उपस्थित काव्यरसिकांनी त्यांना उत्स्फूर्त दाद देताना टाळ्यांचा कडकडाट केला.
कवितेतून उलगडले ‘विंदां’चे व्यक्तिमत्त्व
By admin | Updated: April 30, 2016 00:48 IST