सांगली : राज्य शासनाचा सातबारा संगणकीकरण अद्ययावत करण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या सुरू आहे. हस्तलिखित सातबारा पूर्णपणे बंद करून ऑनलाइन सातबारा उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे. त्यानुसार संगणकीकरण अद्ययावतीकरणासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र
फेरफार (म्युटेशन) कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये १५ फेब्रुवारी ते १५ मार्चअखेर या कालावधीत विशेष मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, या मोहिमेअंतर्गत तहसील कार्यालयात स्वतंत्र फेरफार कक्ष स्थापन करून प्रलंबित नोंदणीकृत नोंदी, वारस नोंदी, बँक बोजा, साठेखत इत्यादी, नोंदणीकृत, अनोंदणीकृत फेरफार नोंदीसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पुढील महिनाभर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत २७ अर्ज दाखल झाले असून, अजूनही ग्रामस्थांनी या सेवेचा लाभ घेऊन आपल्या नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात.